पुणे, दि. २८: सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर तसेच सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाखाली आज जिल्हा रुग्णालय, औंध पुणे येथे सांधेदुखीने ग्रस्त रुग्णावर अत्याधुनिक रोबोटिक सहाय्यीत गुडघे सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आली असून Meril कंपनीतर्फे रोबोटिक प्रणाली, इम्प्लांट्स व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.
ही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागामार्फत पार पाडण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले (अस्थिरोगतज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनिल संतपुरे, डॉ. महेंद्र गरड, डॉ. अनिल विहाडे, डॉ. अमित वनशेळकीकर (अस्थिरोगतज्ञ) या तज्ज्ञांच्या टीमने शस्त्रक्रिया संपन्न केली. शस्त्रक्रियेच्या सुयोग्य पार पाडणीसाठी डॉ. केशव गुट्टे (भुलतज्ञ), डॉ. बालाजी कदम (मुलतज्ञ), डॉ. शोएब शेख (मुलतज्ञ), डॉ. जयश्री मन्नुर (भुलतज्ञ), डॉ. प्राची उत्तरवार (भुलतज्ञ) तसेच शस्त्रक्रियागृहातील परिसेविका सौ. नदा ठोंबरे आणि संपूर्ण स्टाफ यांनी सहकार्य केले.
जिल्हा रुग्णालय औंध, पुणे येथे उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सांधेदुखी व गुडघे प्रत्यारोपणासाठी आता अधिक परिणामकारक, अचूक आणि सुरक्षित उपचार सुलभ होणार असून रुग्णांना अधिकाधिक लाभ होणार आहे.

