पुणे : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात काल रात्री घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने हा परिसर हळहळला आहे. अवघ्या १९ वर्षांच्या तरुणीने भाऊ रंगारी मार्गावरील पांडुरंग या पाचमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून तरुणीची ओळख आणि तिच्या मृत्यूचे कारण देखील समोर आले आहे.
समजलेल्या माहितीनुसार, मृत्यू पावलेल्या तरुणीचं नाव मानसी असून ती काही काळापासून याच इमारतीत राहत होती. तिचे नुकतेच लग्न झाले होते. ती मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी होती.घटनास्थळी तपास करताना पोलिसांना तिची सुसाईड नोट देखील आढळली. त्या नोटमध्ये घरगुती परिस्थिती आणि स्वतःबद्दलचा तिला जाणवलेला न्यूनगंड यांचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुसाईड नोटमध्ये मानसीने, ‘मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करीत आहे’ असे लिहिले असल्याची माहिती आहे. कामाचा ताण आणि मानसिक अस्वस्थता यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मानसी नक्की काय काम करत होती? तिला यासाठी कोणी प्रवृत्त केल का? हे प्रश्न आता समोर आले आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे. तरुणीच्या कुटुंबीयांची माहिती, तिच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी, मानसिक स्थिती आणि इतर बाबींचा तपास सुरू असून पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

