पुणे दि. 28 : राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय भरारी पथक, पुणे यांनी सापळा रचून टँकरद्वारे मद्यार्काची चोरी व तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत दोन टँकरांसह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 नोव्हेंबर २०२५ रोजी भोर तालुका, निगडे गाव हद्दीतील सातारा–पुणे महामार्गावर हॉटेल चौधरी पॅलेस, राजस्थानी प्युअर व्हेज मागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
ही कारवाई आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त (अं.व.द.) , प्रसाद सुर्वे व विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला असता, अशोक लेलॅण्ड कंपनीचे १६ चाकी टँकर क्र. एमएच-१२ वायबी-९१८६ मधून ३९,८०० लि. मद्यार्क व एमएच-१२ युएम-९८८७ मधून ३९,८०० लि. मद्यार्क हे दोन्ही टँकर संशयास्पदरीत्या थांबले व चालकांनी प्लास्टिक पाईपद्वारे मद्यार्क बाहेर काढण्यास सुरुवात केली. पथकाने तत्काळ छापा टाकताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. योवळी २०० लिटर क्षमतेचे दोन ड्रम – प्रत्येकी १८० लि. मद्यार्क, ३५ लिटर कॅन – ३५ लि. मद्यार्क, २० लिटर प्लास्टिक बादली – २० लि. मद्यार्क, रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे, पक्कड इत्यादी साहित्य असे 79 हजार 600 साहित्यासह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक तसेच ज्ञात/अज्ञात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५(अ)(ई), ६७, ८१, ८३, ९० व १०३ अन्वये गु.र.क्र. ५२९/२०२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
या कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक बिराज माने, धीरज सस्ते, एन.जी. निकम, जवान सतिश पांधे, रुतिक कोळपे, शशिकांत भाट, रणजित चव्हाण, संदीप सुर्वे, माधव माडे, राहुल तारळकर तसेच वाहनचालक शशिकांत झिंगळे व अमोल दळवी यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात करीत आहेत.

