संजय राऊत परत रणांगणात:सोमवारी सकाळी पत्रकार परिषद
मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सोमवारपासून पुन्हा सक्रिय राजकीय मोहीम उभारणार असून, सकाळी माध्यमांसमोर येऊन ते महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत. आजारपणामुळे काही दिवस शांत राहिल्यानंतर राऊत पुन्हा मैदानात उतरत असल्याने सत्ताधाऱ्यांसाठी ही धडकी भरवणारी बाब ठरणार आहे.
शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिली होती. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले आहे. मात्र, या भेटीत राऊत यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले होते की, आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितले की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत, तर पूर्वीपेक्षा अधिक जोमाने राजकीय रणांगणात उतरणार, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला होता. संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या लढाऊ वृत्तीवर उद्धव ठाकरे यांनी मोहोर मारली होती. ठाकरे यांच्या या विधानामुळे शिवसेना-ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आचारसंहिता आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा तुफान सुरू आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत यांच्या पुनरागमनाने शिवसेना ठाकरे गटाचा आवाज अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वावर हल्ले, सत्ताधाऱ्यांवर टीका आणि शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर देण्याची संजय राऊत यांची स्टाईल पुन्हा एकदा पहायला मिळेल, अशी पक्षातील सूत्रांची माहिती आहे.
राऊत नेहमीप्रमाणे सरकारवरील टीकेत कोणतीही कुचराई करणार नाहीत, हे निश्चित. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच राजकीय चर्चांना पेट बसणार हेही तितकेच स्पष्ट आहे. त्यांच्या वक्तव्यांवर सत्ताधारी शिंदे-फडणवीस-शिंदे सरकार कशी प्रतिक्रिया देईल? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये राऊतांची भूमिका पुन्हा किती धारदार राहते, हे आगामी दिवसांत समोर येईल.
राज्यातील राजकारणात नेहमीच ठाम भूमिका घेणारे आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या गंभीर समस्यांमुळे घराबाहेर निघू शकले नाहीत. वैद्यकीय तपासणीत त्यांना गंभीर प्रकारचा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून त्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक दिला होता. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली होती.

