निर्मल जैन यांचे प्रतिपादन; ‘ग्रुप टू प्रमोट इंडिया अॅज अकाऊंटिंग जीसीसी’ व ‘आयसीएआय पुणे’ आयोजित चौथ्या जीसीसी समिटचे उद्घाटन
पुणे : “भारत ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरचे (जीसीसी) जागतिक केंद्र बनत असून, या परिवर्तनाच्या प्रक्रियेत सनदी लेखापाल (सीए) निर्णायक भूमिका बजावतील. ‘जीसीसी’च्या माध्यमातून भारतीय सेवा क्षेत्राला जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत,” असे प्रतिपादन अॅक्सेंचरचे व्यवस्थापकीय संचालक निर्मल जैन यांनी केले.
ग्रुप टू प्रमोट इंडिया अॅज अकाऊंटिंग जीसीसीज (डीआयटीएस व वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशन संचलनालय) आणि दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे ‘लेजर ते जागतिक नेतृत्व: ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरला आकार देणारे सीए’ या संकल्पनेवर आयोजित दोन दिवसीय चौथ्या जीसीसी समिटच्या उद्घाटन सोहळ्यात निर्मल जैन बोलत होते.
पुणे स्टेशन येथील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ग्रुपचे संयोजक सीए संजीब संघी, सहसंयोजक सीए अभय छाजेड, ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी, समिटचे संचालक केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए प्रमोद जैन, सीए (डॉ.) एस. बी. झावरे, सीए उमेश शर्मा, सीए दुर्गेश काबरा, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए निलेश येवलेकर, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, खजिनदार सीए नेहा फडके, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे, सीए राजेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य सीए सारिका दिंडोकर, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम आदी उपस्थित होते. प्रसंगी सीए चंद्रशेखर चितळे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या ‘पुणे पंचायत’ या उपक्रमाचे, तसेच आयसीएआय पुणेच्या अद्ययावत संकेस्थळाचे लोकार्पण झाले.
निर्मल जैन म्हणाले, “जीसीसी आता केवळ बॅक ऑफिसपुरते मर्यादित राहिलेले नाही. आज त्या नवोन्मेष, रणनीती, निर्णयप्रक्रिया आणि मूल्यनिर्मितीच्या जागतिक केंद्रांमध्ये रूपांतरित होत आहेत. डेटा एनालिटिक्स, तंत्रज्ञान, जोखमीचे व्यवस्थापन आणि जागतिक वित्तीय कार्यपद्धती यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रक्रिया आता मोठ्या प्रमाणात सनदी लेखापालांच्या नेतृत्वाखाली होत आहेत. सध्या भारतात १,६०० पेक्षा जास्त जीसीसी कार्यरत आहेत. बंगळुरू, अहमदाबाद, पुणे यांसारख्या शहरात त्यांचे महत्व वाढत आहे.”
“सनदी लेखापालांनी आता लेजर-केंद्रित पारंपरिक भूमिकेपेक्षा डिजिटल टूल्स, ऑटोमेशन, एआय, डेटा इंटेलिजन्स आणि जागतिक व्यापार समजून घेण्याची गरज आहे. येणारा काळ आर्थिक कौशल्यासोबत तंत्रज्ञान-प्रावीण्य आणि धोरणात्मक दृष्टिकोन जोपासणाऱ्या सनदी लेखापालांसाठी मोठ्या संधी देणारा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “जीसीसी क्षेत्रातील उच्च-स्तरीय वित्तीय नेतृत्वासाठी जागतिक कंपन्यांची पहिली पसंती भारताला मिळत आहे. व्यवहारिक कामकाजापासून रणनीती निर्मितीपर्यंत सनदी लेखापालांची भूमिका अधिक व्यापक होत असून, ते जागतिक संस्थांचे ‘सोल्यूशन आर्किटेक्ट्स’ बनत आहेत.”
उपक्रमाबाबत बोलताना सीए संजीब संघी म्हणाले, “अकाऊंटिंग जीसीसीसाठी भारत हा सर्वात विश्वसनीय ठिकाण बनवण्याचे ध्येय आहे. कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, धोरणात्मक पाठबळ आणि उद्योग-सहभागावर आधारित मजबूत परिसंस्था उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.”
सीए अभय छाजेड म्हणाले, “डिजिटल फायनान्स, एनालिटिक्स आणि टेक्नॉलॉजी-ट्रान्सफॉर्मेशन याबाबत युवा सनदी लेखापालांना मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. या कौशल्यांच्या बळावर भारत जगातील सर्वात विश्वासार्ह जीसीसी टॅलेंट-हब बनेल.”
सीए सचिन मिणियार यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए नेहा फडके यांनी सूत्रसंचालन केले. सीए निलेश येवलेकर यांनी आभार मानले. दोन दिवसीय या समिटमध्ये जीसीसीमधील उदयोन्मुख ट्रेंड्स, डिजिटल फायनान्स, टॅलेंट ट्रान्सफॉर्मेशन, ऑपरेशनल एक्सलन्स, गव्हर्नन्स फ्रेमवर्क आणि भावी नेतृत्व या विषयांवर सत्रे होणार आहेत.

