पुणे प्रार्थना समाज वार्षिकोत्सव : संस्थेचे १५६ व्या वर्षात पदार्पण
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस ४ डिसेंबर रोजी १५५ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेच्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. अच्युत गोडबोले, डाॅ. अभिजीत सोनवणे आणि डाॅ. मनीषा सोनावणे, डाॅक्टर्स फाॅर बेगर्स ,यांच्या सोहम संस्थेला आणि नेत्रा पाटकर यांच्या झेप संस्थेला यंदाच्या वार्षिकोत्सव सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे धनराज निंबाळकर उपस्थित होते. डेक्कन महाविद्यालयाचे माजी संचालक पद्मश्री डाॅ. के. पद्दय्या यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
अच्युत गोडबोले यांना डॉ रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे दहावे वर्ष असून, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी मराठीतून विज्ञानासहित अनेक विषयांद्वारे विपुल साहित्य निर्मिती केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ. अभिजीत सोनवणे व डॉ. मनीषा सोनवणे ,’डॉक्टर्स फॉर बेगर्स’,सोहम ट्रस्ट या संस्थेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांमधील सामंजस्यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो. याही पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.
‘झेप रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन’ या संस्थेच्या संस्थापिका नेत्रा पाटकर यांची डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विशेष गरज असलेल्या बालकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदा अकरावे वर्ष आहे. रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे तीनही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
डॉ. दिलीप जोग म्हणाले, रविवार, दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बुधवार पेठेतील हरिमंदिर, पुणे प्रार्थना समाजात उपक्रमोपासना होणार आहे. शनिवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धर्मविषयक विचार’ या विषयावर सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता दिपोत्सव होईल. रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ईश्वरोपासना होणार आहे. त्यानंतर नमिता मुजुमदार सह बारे खुर्द कीर्तन मंडळ, सायलीताई महाराज कीर्तन मंडळ यांचे कीर्तन होणार आहे. हे कार्यक्रम बुधवार पेठेतील पुणे प्रार्थना समाजाच्या हरिमंदिरात होणार आहेत.

