पुणे- लेझर आणि बिम लाईटने डोळ्यांना अपाय होऊ शकतो अशा लाईटचा उधळ सार्वजनिक वापर अपघातही घडवून आणू शकतो यामुळे त्यास बंदी असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रतिबंधित लेझर आणि बिम लाईटचा वापर केल्याप्रकरणी भैरवनाथ मित्र मंडळाचे (वैदवस्ती, पिंपळे गुरव) अध्यक्ष गोपी पंढरीनाथ लोखंडे (वय ३४) यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यांना १ हजार रुपये दंड आणि २ दिवसांची साधी कैद ठोठावण्यात आली आहे.कर्णकर्कश्श ध्वनी क्षेपक वापरून लहानगी मुले ,वृद्ध नागरिक ,रुग्ण यांना आणि ज्यांना आवश्यक नाही अशांना त्रासदायी वर्तन रस्तोरस्ती करणाऱ्या मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना देखील अशा प्रकारे गुन्हे , खटले दाखल झाले तर जेलची हवा खावी लागणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १६३ अंतर्गत संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात प्रखर बिम लाईट व लेझर लाईटचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित केला होता. याबाबत सर्व गणेश मंडळांना लेखी आणि तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या.या आदेशाचे उल्लंघन करत, ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ८.३० ते रात्री ११.४५ या वेळेत पिंपळे गुरव परिसरात भैरवनाथ मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत डोळ्यांना इजा पोहोचेल अशा तीव्र लेझर व बिम लाईटचा वापर करण्यात आला.याची दखल घेऊन सांगवी पोलिस ठाण्यात बीएनएसएस कलम २२३ (तत्कालीन भादवि कलम १८८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सांगवी पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपी गोपी लोखंडे यांना दोषी ठरवले.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पोलिस उपायुक्त (परिमंडळ-१) संदिप आटोळे, सहाय्यक आयुक्त शशिकांत महावरकर आणि सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोनि अमोल नांदेकर, पोउनि रोहित पाटील, विजय शेलार, पोहवा विशाल चौधरी, प्रमोद जराड, तुषार साळुंखे यांच्या पथकाने केली.पोलिस उपायुक्त संदिप आटोळे यांनी सांगितले की, भविष्यातही अशा प्रतिबंधित लेझर व बिम लाईटचा वापर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी आणि मंडळांनी पोलिस आदेशांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

