बेकायदेशीर रस्ते खोदाई करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करा ..टाळाटाळ का आणि कशासाठी ?
पुणे- एकीकडे नगर अभियंता पदासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले महापालिकेतील पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर सोशल मीडियामध्ये रोज शक्तिमान चहाचा आस्वाद घेताना दिसत असले, तरी दुसरीकडे मात्र ते बेकायदेशीर पणे रस्ते खोदणाऱ्या किरकोळ किरकोळ ठेकेद्रांना सुद्धा घाबरत असल्याचे आरोप आता होताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजेंद्र शिंदे, मकरंद पेठकर, अशोक हरणावळ,उपशहरप्रमुख प्रशांत राणे, आबा निकम, पराग थोरात, अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, सोहम जाधव, परेश खांडके, हेमंत यादव, संतोष तोडे, राजेश मोरे, जुबेर शेख, अनिल दामजी, गौरव गायकवाड, अभिषेक जगताप, आतिष अनारसे, सचिन घोलप, प्रतिक आल्हाट, दिलीप पोमण, गणेश घोलप, निलेश वाघमारे, सुरज खंडाळे, संजय साळवी यांनी पावसकर यांना घेराव घालून बेकायदेशीर रस्ते खोदाई करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करा ..टाळाटाळ का आणि कशासाठी ? असे सवाल करत भांडून सोडले . आणि नंतर लेखी निवेदन दिले.
या संदर्भात संजय मोरे यांनी सांगितले कि,’ दिवाळीच्या आधीपासून सुरू झालेली रस्तेखोदाई अजून पर्यंत मनमानी पद्धतीने चालूच आहे. तसेच ज्या ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत त्या ठिकाणी फक्त राडाराडा टाकून खड्डे झाकण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी राडारोडा असाच पडलेला आहे.आपणास वारंवार आमच्या युवासेने मार्फत पत्र देऊन फोटो दाखवून व्हाट्सअप वर व्हिडिओ पाठवून याबाबत कल्पना देण्यात आलेली आहे. परंतु आपणा कडून कोणत्याही पद्धतीची ठेकेदारावर जरब बसेल अशी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे निष्क्रिय पथविभागाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे पत्र आपणांस देत आहोत. आज फक्त आपणास घेराव घालून पुणे शहरातील रस्त्यांच्या बेकार अवस्थेच्या फोटोंची माळ आणून तशी जाणीव करून दिली आहे. रस्ते सुधारणांबाबत आपल्या खात्यामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. व त्यांच्यावर महानगरपालिकेची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा पुणेकरांच्या प्रश्नाबाबत आपले खाते उदासीन असल्याबाबत नागरिकांसाठी उग्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
पुणे महानगरपालिकेला रस्त्याच्या झालेल्या दुरावस्था कामाबाबत कोणताही भुर्दंड नको अशी आमची भूमिका आहे. महानगरपालिका प्रशासनाला झालेल्या त्रासाबद्दल व पुणेकर नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घेराव घालून पत्र देउन पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावस्कर यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार पावसकर यांनी ठेकेदेरांना खोदलेला रस्ता व्यवस्थित करण्याचे आदेश पारीत केले.

