पुणे स्मार्त सिटीतील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये वीस निरागस लहानग्यांना आत बंद करून सेविका आणि मदतनीस अंगणवाडीत कुलूप टाकून बाहेर गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुलं आतमध्ये भयभीत होऊन रडत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालक आणि स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. या व्हिडिओमध्ये मुलांचा गोंधळ, आक्रोश आणि भीतीचा स्पष्ट आवाज ऐकू येत आहे. हा प्रकार काही क्षणासाठी नव्हे तर जवळपास एक तास घडल्याचे सांगितले जाते. शिक्षण आणि संरक्षणासाठी असलेल्या अंगणवाडीतच मुलांना धोका निर्माण झाल्याने सर्वत्र तिव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बोलावलेल्या बैठकीसाठी जावे लागणार होते. त्यामुळे या दोघींनी अंगणवाडीतील सुमारे 20 मुलांना आतच बंद केले आणि स्वतः बाहेर जाऊन कुलूप लावले. उद्देश काहीही असो पण एवढ्या लहान मुलांना संपूर्णतः एकटे सोडणे ही अत्यंत निष्काळजीपणाची आणि कायदेशीरदृष्ट्या धोकादायक कृती असल्याचे पालकांचे मत आहे. मुलांना काही अपघात झाला असता, आगीत अडकले असते किंवा कोणी आजारी पडले असते, तर त्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने मुलांची सततची हाक आणि रडण्याचे आवाज ऐकले. त्यानंतर ही बाब त्वरित मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना कळविण्यात आली. त्यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत दोन्ही सेविकांना लगेच बैठक सोडून येण्याचे आदेश दिले. काही वेळाने कुलूप उघडल्यानंतर आतून मुलं पूर्णपणे घाबरलेली, काहींना घाम फुटलेला तर काही मुलं थरथरत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. पालकांना ही माहिती मिळताच ते संतापाने अंगणवाडीत धावत पोहोचले आणि संबंधित सेविका व प्रशासनाला जाब विचारला.
ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. आमच्या चिमुकल्यांना अशा धोकादायक स्थितीत कोणत्या परवानगीने ठेवले गेले? ज्यांच्यावर मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे त्यांनीच असा निष्काळजीपणा का केला? असे प्रश्न पालकांकडून विचारले जात आहेत. अनेक पालकांनी या दोघींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. काही पालकांनी हे अंगणवाडी व्यवस्थापनाचं अपयश असल्याचे म्हटले असून, संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी कडक नियम आणावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेनंतर आता बाल विकास विभागाकडून अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली असून मुलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला आहे. व्हिडिओच्या आधारे तपास वेगाने सुरू असून निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधित सेविका आणि मदतनीस यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पालकांनी मुलांना विश्वास देत त्यांना सांभाळले असले तरी त्या चिमुकल्यांच्या मनावर बसलेली ही भीतीची कायमची छाप किती मोठी आहे हे शब्दांत सांगणे कठीण आहे. या घटनेने पुन्हा एकदा बाल सुरक्षा आणि सरकारी व्यवस्थेतील त्रुटी यावर मोठा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

