मालवण -माझ्या पायाखालची जर वाळू सरकली असती तर एवढे पैसे रवींद्र चव्हाण तुम्ही वाटले असते का? कोणाच्या पायाखालची जमीन सरकते आहे हे स्पष्ट होत आहे. जनता तुमच्या बाजूने नाही हे स्पष्ट होत आहे त्यामुळे तुम्ही मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही जनतेला विकत घेणार? तुम्ही मैदानात लढा ना? असे म्हणत शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
नीलेश राणे म्हणाले की, लोकांच्या हितासाठी मी काही करायला गेलो तर तुम्ही माझे नाव इकडे-तिकडे जोडणार का? मी अजूनही तुमचा आदर सोडलेला नाही. मी आजही तुमचा आदर करतो पण निवडणूक लढायची ही पद्धत नाही यावर तुम्ही बोलावे. मी लहान माणूस आहे. पण तुम्ही मोठी लोकं आहात तुम्ही का रोजच्या रोज अडकत आहात? मतदार यादी घोळ, कधी पैसे वाटप तुम्ही असे वागण्याची अपेक्षा नाही. माझ्यावर टीका करा पण हे जर थांबले नाही तर मी बोलत राहणार. तुम्हाला जे वाटेल ते करा.
नीलेश राणे म्हणाले की, चव्हाण यांनी मोठ्या पदावर काम केलेले आहे. आजही मोठ्या पदावर आहेत. पण मी काही राजकारणात नवीन आलेलो नाही. माझ्या आमदारकीची 4 वर्षे अजून बाकी आहेत यातून मला काहीच मिळणार नाही. पण हे सर्व जर थांबले नाही तर उद्या जिल्ह्याची काय अवस्था होईल म्हणून मला हे सर्व करावे लागते. कुणीही जिंकले तरी महा युतीचा विजय होणार आहे ना मग चव्हाणांनी ते कुणाचा आदर्श बाळगता हे आम्हाला समजू द्यावे. रवींद्र चव्हाण यांच्याशी आमचे काही वाकडे नाही. महायुतीसाठी आम्ही काम केले आहे.
नीलेश राणे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 50 लाख, एक कोटी रुपये रोज येत आहे. म्हणजे ही निवडणूक गेली कितीला? दहा हजार-15 हजार रुपये देत मत विकत घेतली जात आहेत. या बाजूने वाटप होत आहे हे जर समजले असते तर ते 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत गेले असते. काय संस्कृती आपण तयार करत आहोत? जिल्ह्यात काय वातावरण निर्माण करत आहोत? याचा काहीही देणंघेणं नाही जिल्हा बिघडला तरी चालेल पण निवडणूक जिंकायची ही संस्कृती जिल्ह्यात अजिबात नव्हती. हे सर्व एकच माणूस करत आहे, हे आल्यापासून हे सर्व सुरू झाले आहे. मी पोलिसांना योग्य ती कारवाई करायला सांगितले आहे. काय FIR तयार होतो याकडे माझे लक्ष आहे, असे म्हणत त्यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाणांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नीलेश राणे म्हणाले की, जिल्हाभरात माझे लक्ष आहे, मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे जिथे काही वाटले तिथे कॅमेरा काढत शुट घ्या आणि मला कळवा त्यावर काय कारवाई करायची हे मी योग्य त्या अधिकाऱ्यांना सांगतो. पण मी यांची पाठ आता सोडणार नाही. ही जी रवींद्र चव्हाण यांची माणसं आहेत त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे पोलिस यंत्रणा किंवा निवडणूक अधिकारी लावले पाहिजे. नाहीतर ही लोक जिल्हा खड्यात घालतील.

