मी मातीतला माणूस असून, लोककलेने माझे भरणपोषण केले. आज लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार स्विकारताना आनंद होत असल्याची भावना गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ‘निहाल हो गयी जिंदगी मेरी’… अशा शब्दांत भीमरावांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. १५ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद्गंध पुरस्कार २०२५’ च्या दिमाखदार समारंभात ते बोलत होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिषजी शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद्गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये शाहीर श्री राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र), श्री.प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते श्री. जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र), श्री. परेश मोकाशी (दिग्दर्शक), श्रीमती मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) यांना ‘मृद्गंध पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा हा पुरस्कार आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना मान्यवर पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार, अर्थतज्ज्ञ-माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, यांच्यासह संगीत-अभिनय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
‘रसिक मायपाब आणि कुटुंबाच्या साथीने मी माझ्या बाबांना आठवणीतून जिवंत ठेवू शकलो. बाबांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या निमित्ताने आपले ऋणानुबंध आणि रसिकांचे प्रेम आमच्यावर असंच कायम राहू द्या’, असं सांगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक व विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी उपस्थितांचे आभार मानले.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा पहाडी आवाज हा महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज होता. वंचितांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून जो संघर्ष उभा केला ते कौतुकास्पद आहे. आता नंदेश त्यांचं कार्य ज्या पद्धतीने पुढे नेतो आहे आणि उत्तम अशा हिऱ्यांना आपल्यासमोर घेऊन त्यांना पुरस्काररूपी कौतुकाचं बळ देतोय ते नक्कीच अभिनंदनीय आहे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याप्रसंगी सांगितलं.

