गुरू तेग बहादुर जी यांचा जाज्वल्य इतिहास ग्रंथालयांद्वारे समाजापर्यंत पोहोचविणार : चंद्रकांत पाटील
नांदेडच्या गुरू गोविंदसिंग अध्यासन केंद्राचे बळकटीकरण करणार : चंद्रकांत पाटील
सरहद, पुणेतर्फे गुरू तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांचा शुभारंभ
‘गुरू तेग बहादुर जी’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : हिंदुस्तानवर सातत्याने होणारी परकीय आक्रमणे रोखण्यात देशातील मोजक्या राज्यांचे मोठे योगदान आहे. यात महाराष्ट्रासह पंजाबचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय असून त्यांच्या प्रयत्नातून धर्मावरचा आघात रोखला गेला. हा जाज्वल्य इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक महत्वाचे ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक ग्रंथालयात गुरू तेग बहादुर जी यांच्यावरील पुस्तक पोहोचविण्याचा तसेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील गुरू गोविंदसिंग अध्यासन केंद्राचे बळकटीकरण करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
सरहद, पुणेतर्फे गुरू तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा तसेच ‘गुरू तेग बहादुर जी’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुनानक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संतसिंग मोखा होते तर गुरुद्वारा दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, डॉ. अमोल देवळेकर, शैलेश वाडेकर, अनुज नहार मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आज (दि. २६) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, पुस्तक माणसाच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य करते. आपल्या देशात ग्रंथांना गुरू मानले गेले आहे. ‘गुरू तेग बहादुर जी’ या पुस्तकाच्या माध्यमातून गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी याविषयी सघन काम होणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात गुरू तेग बहादुर जी यांनी मोलाचे कार्य केले. त्यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त देशात येत्या वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, त्यांचा प्रारंभ या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या द्वारे शिखांचा इतिहास देशभरात पोहोचविण्यास मदत होईल.
चरणजित साहनी म्हणाले, गुरू तेग बहादुर जी यांच्या कार्याविषयी चित्रकथेच्या माध्यमातून सोप्या शब्दात या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. वर्षभरात शाळा-शाळांमध्ये हे पुस्तक वितरित केले जाईल, ज्या योगे गुरू तेग बहादुर जी यांचे कार्य जनसामन्यांच्या मनात रुजविले जाईल. विद्यार्थ्यांनी हा इतिहास जाणून घ्यावा असे सांगून साहनी म्हणाले गुरू तेग बहादुर जी यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित निबंध स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचाल लेशपाल जवळगे यांनी केले तर आभार अनुज नहार यांनी मानले. ना. चंद्रकांत पाटील यांचे स्वागत डॉ. अमोल देवळेकर, संतसिंग मोखा, चरणजितसिंग साहनी यांनी केले.

