- पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील मुख्यालयात महानगर आयुक्तांनी घेतली सर्व विभागांची आढावा बैठक
- 5 डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्ते करण्याच्या महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या सूचना
- हिंजवडी येथील नवीन प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत बैठकीत घेतला आढावा
- हिंजवडी – पिरंगुट – घोटावडे राजमार्गामधील हिंजवडी फेज- 1 ते हिंजवडी फेज- 3 दरम्यानचा रस्ता व त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी एमआयडीसीमार्फत जिल्हाधिकारी यांना भूसंपादन प्रस्ताव सादर करणार
- हिंजवडी मेट्रो लाईन- 3 खालील रस्त्यांचे खड्डे तातडीने भरून डांबरीकरणासह रस्ता सुस्थितीत एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या मेट्रोला सूचना
- हिंजवडी परिसरामध्ये कायमस्वरूपी वाहतूक सिग्नल्स बसविण्यासाठी पीएमआऱडीए निधी देणार
- धोकादायक धूळ व बेदारकार डंपर चालविणा-या आरएमसी प्लॅन्ट व बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईच्या सूचना
- पुणे – मुंबई बाह्यवळण मार्गावर विविध ठिकाणी अंडरपास तसेच राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्ते बांधणार
- भूगाव बायपास रस्त्याचे रखडलेले भूसंपादन लवकर, कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देणार
- शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ते बांधणार
पुणे – हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडून निर्णायक पाऊल उचलण्यात आले असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांनुसार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आज (दि.26) आकुर्डी येथील मुख्यालयात विभाग प्रमुखांसह महसूल, पोलिस,एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला हिंजवडी, वाघोली येथील नागरिकांनीदेखील उपस्थित राहून सूचना मांडल्या. बैठकीत प्रामुख्याने, 5 डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्ते करण्याच्या सूचना डॉ. म्हसे यांनी दिल्या असून, हिंजवडी येथील प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत आढावा घेण्यात आला. हिंजवडी – पिरंगुट – घोटावडे राजमार्गामधील हिंजवडी फेज- 1 ते हिंजवडी फेज- 3 दरम्यानचा रस्ता व त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी एमआयडीसीमार्फत जिल्हाधिकारी यांना भूसंपादन प्रस्ताव सादर केला जाणार असून, हिंजवडी मेट्रो लाईन- 3 खालील रस्त्यांचे खड्डे तातडीने भरून डांबरीकरणासह रस्ता सुस्थितीत एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या मेट्रोला सूचनादेखील महानगर आयुक्तांनी केल्यात. तसेच, हिंजवडी परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पीएमआऱडीए निधी देणार असून, धोकादायक धूळ व बेदारकार डंपर चालविणा-या आरएमसी प्लॅन्ट व बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईच्या सूचना देऊन, पुणे – मुंबई बाह्यवळण मार्गावर विविध ठिकाणी अंडरपास तसेच राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्ते बांधणे, शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ते बांधण्याचे नियोजनदेखील महानगर आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच, भूगाव बायपास रस्त्याचे रखडलेले भूसंपादन लवकरच मार्गी लावून कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती श्रुती नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अनुक्रमे हिंजवडी येथील नवीन रस्ते अनुषंगिक भूसंपादन, हिंजवडी येथील मेट्रो लाईन, रामवाडी मेट्रो स्थानक, हिंजवडी येथील वाहतूक समस्या, तसेच परिसरातील अवजड वाहतुकीसाठी नियमावली तयार करणे, बालेवाडी व बाणेर येथे अंडरपास तयार करणे, हिंजवडीला जोडणारे सेवा रस्ते व अंडरपास तयार करणे, हिंजवडी फेज 1, 2 व 3 येथे पावसाळी पाण्याच्या निचऱ्याच्या अनुषंगाने नियोजन, तसेच सदर ठिकाणी मैला शुद्धिकरण प्रकल्प उभारणे, राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकामध्ये विकसित करण्यात आलेल्या फ्री-वे प्रमाणे हिंजवडी येथे विकसन करणे, तसेच हिंजवडी येथे घनकचरा व्यवस्थापन तसेच शासकीय हॉस्पिटलची उभारणी, याबाबत दि. 10 जुलै 2025 रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती. या बैठकीतील निर्देशाप्रमाणे आढावा घेण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि.26) आढावा बैठक पार पडली. या बैठकीला पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस उपायुक्त (वाहतूक) सारंग आव्हाड, मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन समन्वयन अधिकारी कल्याण पांढरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह-शहर अभियंता बापू गायकवाड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)चे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती अर्चना पाठारे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MSETCL)चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तुषार दहागावकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आय़ुक्त सतीश नांदूरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्यासह पीएमआरडीएचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक श्रीमती श्वेता पाटील, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी तसेच शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो लाईन-3चे सवलतकार कंपनीचे प्रतिनिधी अनिलकुमार सैनी, महामेट्रोचे राजेश जैन आदी उपस्थित होते.
या बैठकीत हिंजवडी येथील नवीन प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी पीएमआरडीएकडून आजपर्यंत 18 प्रस्ताव दाखल झालेले असून, त्यापैकी तीन रस्त्यांची मोजणी पूर्ण झालेली असल्याचे सांगितले. इतर उर्वरित आखणींबाबत डॉ. योगेश म्हसे यांनी प्राधिकरणाचे संचालक अविनाश पाटील व सुरेंद्र नवले यांना मार्गदर्शनपर सूचना देवून, उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. प्रांत अधिकारी तसेच प्राधिकरणाचे सह-संचालक श्रीमती श्वेता पाटील हे पुढील दोन दिवसांमध्ये बैठक घेवून याबाबत धोरण निश्चित करणार आहेत. तसेच बैठकीत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता तसेच प्रादेशिक अधिकारी यांना तातडीने हिंजवडी – पिरंगुट – घोटावडे राज्यमार्ग – 130 मधील हिंजवडी फेज- 1 (विप्रो सर्कल फेज – 1) ते हिंजवडी फेज- 3 (माण) दरम्यानचा रस्ता व त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी एमआयडीसीमार्फत भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिलेत. यानंतर हिंजवडी मेट्रो लाईन- 3 खालील रस्त्याच्या खड्ड्यांबाबत चर्चा झाली. यावेळी सवलतकार कंपनी यांना निर्देश देण्यात आले की, मेट्रो लाईनचे काम सुरू करण्यापूर्वी सदर ठिकाणचा रस्ता ज्या स्थितीत होता, त्याच स्थितीमध्ये रस्ता डांबरीकरणाने पूर्ववत करून एमआयडीसीकडे हस्तांतरीत करावा. तसेच, यावेळी बैठकीत रस्त्यामधील खड्डे व होणारे अपघात याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी पुणे – मुंबई बाह्यवळण रस्त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली असता, विविध ठिकाणी अंडरपास तसेच राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्ते तातडीने बांधण्यात येत असल्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)च्या अधिकार्यांनी सांगितले.
हिंजवडी येथील नैसर्गिक नाल्यांच्या सर्वेक्षणाबाबत चर्चा झाली असता, एमआयडीसीच्या अधिकार्यांनी नाल्यांचे सर्वेक्षण सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्यूशन्स यांनी पूर्ण केले असल्याचे सांगीतले. सदरचा अहवाल प्राधिकरण कार्यालयास पुढील दोन दिवसात सादर करण्यात येत आहे. बैठकीत याबाबत सह-संचालक श्रीमती श्वेता पाटील तसेच एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी एकत्रित बसून जलसंपदा विभागाच्या अहवालासह नाल्यामधील झालेली अतिक्रमणे, अडथळे याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. या बैठकीत हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशन यांनी हिंजवडी परिसरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत विनंती केली. याबाबत अंदाजपत्रक तयार करून पीएमआरडीए कार्यालयास सादर केल्यास पीएमआरडीए सदरची कार्यवाही करेल, असे आश्वासन महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले. तसेच, या परिसरामध्ये असणारे बांधकाम व्यावसायिकांचे आरएमसी प्लॅन्ट, तसेच बांधकामाची जागा बंदिस्त न केल्याने खूप धूळ निर्माण झालेली आहे, असे बैठकीला उपस्थित हिंजवडीतील नागरिकांनी सांगीतले. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ट्रक्स आच्छादित करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पीएमआरडीएचे संचालक अविनाश पाटील यांना याबाबत कार्यवाही करण्याबाबतच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्यात. तसेच या परिसरातील रस्त्यांची साफसफाई करण्याबाबतचे निर्देशी एमआयडीसीच्या अधिकार्यांना देण्यात आले.
पुणे – कोलाड राष्ट्रीय महामार्गाच्या भूगाव गावठाण येथील वाहतूक कोंडीबाबत पीएमआरडीएने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या भूगाव बायपास रस्त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. सदर रस्त्याचे भूसंपादन हे पीएमआरडीएमार्फत करण्यात येत असल्याबाबत बैठकीत सांगण्यात आले. या रस्त्याची लांबी ही 850 मीटर इतकी असून, रुंदी 18 मीटर इतकी आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यामध्ये कंत्राटदारास कार्यादेश देण्यात येत आहेत, असे एनएचएआयच्या कार्यकारी अभियंता श्रीमती श्रुती नाईक यांनी सांगितले. सूर्या हॉस्पिटल ते साखरेवस्ती यादरम्यान मोजणी वेळेस स्थानिक शेतकऱ्यांनी रस्त्याच्या आखणीच्या अनुषंगाने आक्षेप नोंदविले होते. संदर्भातही बैठकीत चर्चा होऊन, या रस्त्याची रस्ते निय़ोजन (RP) आखणी अंशत: बदलण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच, बैठकीमध्ये भूसंपादनासाठी द्यावयाच्या मोबदल्याच्या अनुषंगानेही चर्चा झाली. इतर उर्वरित आखणीबाबत महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पीएमआरडीएचे संचालक अविनाश पाटील यांना व प्रांताधिकारी नवले यांना मार्गदर्शनपर सूचना केल्यात. तसेच, उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्याबाबतचे निर्देश दिलेत.
अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजना व नियोजनांवरदेखील या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. वाघोली ते शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करायच्या दृष्टीने पुणे – अहिल्यानगर मार्गास समांतर 30 मीटर रस्ते नियोजन (आरपी) नकाशानुसार खराडी जकात नाका ते केसनंद ते बकोरी रस्ता हा वाघोली बायपास रस्ता असून, रस्त्याचे सीमांकनाचे काम पीएमआरडीएकडून पूर्ण केले आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत रस्ता विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. सदर रस्त्याच्या प्रत्यक्ष केलेल्या आखणीमध्ये व आरपी रस्त्याच्या मार्गामध्ये तफावत असल्याचे दिसते. पुणे मनपा यांच्याकडून सदर रस्ता विकसित करण्याची कार्यवाही सुरु असून ,सदर रस्त्याचे काम होण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या नियोजन विभाग, विकास परवानगी विभाग, अधीक्षक भूमी अभिलेख यांनी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाशी समन्वय साधून रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच, या संबंधित पीएमआरडीए क्षेत्रातील एफएसआय, टीडीआर देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही विकास परवानगी विभाग यांच्यामार्फत करण्याचे निर्देश महानगर आय़ुक्तांनी यावेळी दिलेत. वाघोली व केसनंद परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून खराडीपासून केसनंद चौक बायपास करून पुणे – अहिल्यानगर मार्गावरील लोणीकंदपर्यंतच्या नवीन वाघोली,केसनंद बायपास रस्त्याच्या नवीन मार्गाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित करण्यात यावा, जेणेकरून वाघोली व केसनंद या परिसराला नवीन बायपास रस्ता उपलब्ध होईल, असेही महानगर आयुक्तांनी निर्देशित केले.

