३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प
पुणे, दि.२६ नोव्हेंबर, “आधुनिकीकरणाच्या वातावरणात अध्यात्माची चुकीची धारणा वाढतांना दिसते. केवळ भितीपोटी मनुष्य अध्यात्माचा आधार घेतो. याचा अनुभव घ्यायचा असेल तर पूर्णत्व आणि समत्वाने जगावे. मनुष्य वर्तमान काळात जगण्याचे सोडून भूत आणि भविष्यात अधिक काळ रमतो जे दुखाःचे सर्वात मोठे कारण आहे. साक्षीभावाने जगण्याची कला शिकली तर तो शांती आणि सुखात राहू शकतो.” असे विचार किमया आश्रमचे संस्थापक स्वामी कृष्ण चैतन्य यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत ३०व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘आधुनिक जीवन पद्धती आणि अध्यात्म’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्रा.गायकवाड व ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
स्वामी कृष्ण चैतन्य म्हणाले,” अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी भिन्न स्वरूपाच्या आहेत. स्वतःला मिटविण्यासाठी अध्यात्म असून त्यातून आनंद व शांती मिळते. मौन आणि शांतीचा मार्गच परमेश्वराकडे जाणारा आहे. विज्ञान हे नवीन संशोधनासाठी असून त्यातूनच मनुष्य जीविंत राहू शकतो.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये आणि किंकर विठ्ठल रामानूज व किंकर विश्वेशरैय्या आनंदा यांची व्याख्याने झाली.
सकाळच्या सत्रात प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘ मी, माझे हट्ट आणि मनःशांती’ या विषयावर विचार मांडताना सांगितले की, त्रेतायुगा पासून कलियुगापर्यंतचे जग हट्टावर चालले आहे. हट्ट ऐकणे आणि न ऐकणे दोन्ही विनाशाकडे जाते. त्रेतायुगात कैकयी ने जो हट्ट केला त्यातून दशरथाला हो म्हणावे लागले. हट्ट जेव्हा हक्काच्या वर येते त्यावेळेस धर्म म्हणून उदयास येते. हे जग हट्टावरच चालले आहे. त्यात बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट हा वेगळाच असतो. आनंद आणि शांतीच्या प्राप्तीसाठी मी ला घट्ट चिकटलेला हट्ट बाजूला सारावा.
प्रा.दत्ता दंडगे यांनी आभार मानले. प्रा.डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले.

