वणी, यवतमाळ–नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आपला हक्क सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना माझ्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा निर्णय होता. अनेक अडथळे आले, विरोधही झाला, पण आम्ही ठाम होतो. कितीही टीका झाली, कितीही अडथळे आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील पक्षच काही ठिकाणी एकमेकांविरोधात लढत असल्याने लाडक्या बहिणींचे मत कोणाकडे वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे यांनी केलेले हे विधान म्हणजे लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाचे? या राजकीय वादात भर टाकणारे ठरत आहे. राज्यातील महिला मतदार हेच पुढील निवडणुकांचे गेमचेंजर ठरणार असल्याचे सर्व पक्षांना ठाऊक असल्याने, या योजनेभोवती प्रचंड राजकीय धुमाकूळ सुरू आहे.
राज्यात निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. 2 डिसेंबर रोजी अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्यासाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी जोरात सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर महिला मतदारांनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला पाठिंबा दिला होता. परिणामी सत्ता मिळवण्यात महिलांच्या मतांची मोठी भूमिका ठरली. त्यामुळे आता होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही लाडक्या बहिणी कोणत्या पक्षाच्या बाजूने मतदान करणार, याकडे राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे. त्यातच स्थानिक राजकीय समीकरणांमुळे महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहत असल्याने महिलांचे मत नेमके कुठे जाईल? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचे उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू केली. महायुती सरकार म्हणून आम्ही टीममध्ये मिळून हा निर्णय घेतला होता. या योजनेला राजकारणात किती विरोध, अडथळे आले, किती टीका झाली, हे सर्वज्ञात आहे. परंतु जनतेला, विशेषतः महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ही योजना बंद होणारच नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या विधानातून शिंदे यांनी महिलांच्या मतांची दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विदर्भातील प्रचारसभांमध्ये मोठा उत्साह असल्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक सभेत महिलांची प्रचंड उपस्थिती दिसत आहे. लाडक्या बहिणींचा उत्साह आणि विश्वास पाहून शिवसेनेच्या उमेदवारांना निश्चितच फायदा होईल, असा त्यांचा दावा आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत विविध वयोगटातील मतदार प्रचारात सक्रियपणे सहभाग घेत आहेत. यावरून स्थानिक नागरिकांचा विकासावर आधारित मतदानाचा कल अधिक जाणवतो, असे शिंदेंचे म्हणणे आहे.
शिंदे पुढे म्हणाले की, विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे. मी मुख्यमंत्री असताना ज्या नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष नव्हते, तिथेही विकासकामांसाठी निधी दिला. पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, रस्ते, मैदानं, उद्यानं, आरोग्य सुविधा अशा सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने निधीची कमतरता भासू दिली नाही. राजकारणापेक्षा जनतेचा प्रश्न महत्वाचा, अशी भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. त्यामुळे आता लोक कोणत्या पक्षावर विश्वास ठेवतात आणि विकासाच्या मुद्द्यावर कोण विजयी ठरणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.
नगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांचे मतांचे गणित नेहमीच निर्णायक ठरते. पण या वेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण महायुतीतच असलेले वेगवेगळे पक्ष स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढत असल्याने महिलांना कोणाला मतदान करायचे? हा प्रश्न पडला आहे. पण सरकारने दिलेला लाभ, आर्थिक मदत आणि भविष्याच्या आशा या गोष्टी महिलांच्या मतांवर परिणाम करणार हे निश्चित. त्यामुळे आता 2 डिसेंबर रोजी महिलांचा कल कोणत्या दिशेला झुकतो, यावर अनेक नगरपालिकांचे भविष्य ठरणार आहे आणि त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

