भाजपच्या राजवटीत संविधान दिन साजरा करणे गुन्हा, संविधान रक्षणासाठी लढत राहू: झीनत शबरीन.
मुंबई, दि. २५ नोव्हेंबर
भाजपच्या राजवटीत संविधान दिन साजरा करणे आणि संविधानाची प्रस्तावना वाचणे हा गुन्हा ठरला आहे. आज संपूर्ण भारत संविधान दिन साजरा करत असताना मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संविधानाची प्रस्तावना वाचण्यापासून पोलिसांनी रोखले व ताब्यात घेतले, हा लोकशाही मूल्यांवरचा थेट हल्ला आहे. संविधान आणि लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न एकत्रितपणे हाणून पाडू, असे मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांनी म्हटले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोटचोरी विरोधात बोलू नये म्हणून सार्वजनिक पत्र लिहून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणा-या २७२ सेवानिवृत्त IAS, IPS, IRS अधिका-यांपैकी एक अधिकारी ए. के. गौतम यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर संविधान दिनानिमित्त मुंबई युवक काँग्रेस संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून त्यांना संविधानिक मूल्यांची आठवण करून देणार होते पण पोलिसांनी दडपशाही करून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा सरकारने पोलिसांच्या मदतीने केलेला हा प्रकार निषेधार्ह असून लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा हा लढा सुरुच राहिल असे झीनत शबरीन यांनी सांगितले.
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मरीन ड्राईव्ह येथून ताब्यात घेऊन आझाद मैदान येथे घेऊन गेले. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान येथे व संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालया जवळच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.

