तुम्ही बॉम्बेचे नाव मुंबई केले नाही हे फार चांगले केले, केंद्रीय मंत्र्याच्या विधानावर संताप – राज ठाकरे म्हणाले मराठी माणसा आता तरी तुला कळायला हव , जागा हो …
मुंबई – केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बाँबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.या मंत्र्याने केलेले हे विधान आपल्या बॉसला खुश करण्यासाठी केलाय आणि बॉस ला मुंबई महाराष्ट्रापास्य्न तोडून गुजरातला जोडायची असल्याने हे विधान केलय ,आता तरी मराठी माणसाला हे कळायला हवे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आयआयटीच्या नावात बॉम्बे हे नाव तसेच राहिले, त्याचे मुंबई झाले नाही हे चांगले झाले, असा उल्लेख केला. या एका वाक्याने मराठी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. मुंबईचे नाव मराठी इतिहास, मराठी संस्कृती आणि या भूमीच्या मूळ देवी मुंबाशी जोडलेले आहे. त्यामुळे मुंबईऐवजी बॉम्बेचा आग्रह व्यक्त करणे ही महाराष्ट्राच्या अभिमानावर घाला असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
या वादाला उत्तर देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी थेट प्रहार केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून भाजप नेतृत्वावर आणि केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, जितेंद्र सिंह यांचं विधान हे केंद्र सरकारच्या मानसिकतेचं दर्शन घडवतं. मुंबई जी मराठी माणसाची आहे, तिला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आजही शिजतोय. त्यांनी इशारा दिला की काही शक्ती मुंबई व आजूबाजूचा एमएमआर परिसर गुजरातमध्ये जोडण्याचे प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच चंदीगडचा मुद्दा उचलून धरण्याची आठवण देत राज ठाकरे यांनी मराठी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंह यांच्या मूळ प्रदेशाचा उल्लेख करत म्हणाले, त्यांचा मुंबईशी, महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. तरीही ते येऊन मुंबईच्या नावावर भाष्य करतात. फक्त दिल्लीतील नेतृत्वाची मर्जी ठेवण्यासाठी ही वक्तव्ये केली जातात. त्यांनी केंद्रावर आरोप केला की मुंबई नेहमीच डोळ्यात खुपते, कारण ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून इथे मराठी ओळख दृढ आहे. सुरुवातीपासूनच काही जण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आले आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनतेने तो प्रत्येकवेळी हाणून पाडला आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, आणि राहणार, हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
आयआयटीप्रमाणेच अनेक राष्ट्रीय संस्थांच्या नावात बॉम्बे, मद्रास अशी जुनी नावे कायम आहेत. मात्र, मुंबईच्या नावाचा संदर्भ आल्यानंतर नेहमीच राजकीय वादंग निर्माण होतो. मराठी ओळख, भाषा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा संघर्ष कायम आहे. त्यामुळे या विधानाने महाराष्ट्रातील मराठी जनतेला जणू पुन्हा एकदा सज्जतेचा इशारा मिळाला आहे. मुंबई आपलीच आहे आणि राहील, हे संदेश अनेकांनी दिला आहे. आता केंद्र सरकार व भाजप यांची पुढील भूमिका काय असते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
राज ठाकरे यांनी केलेले आवाहन वाचा….
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बाँबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.
आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. ‘मुंबई’ नको ‘बाँबे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !
राज ठाकरे ।

