पुणे- महापालिकेने शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.गेली असंख्य वर्षे धूळ खात पडलेली हही योजना भाजपला आगामी धूळ चारू शकेल असे असतानाही ती राबविण्याचा हट्ट नेमका कोणासाठी पुरविला जातो आहे,कित्येक वर्षे यापूर्वीच्या आयुक्तांनी आणि काही लोकप्रतिनिधींनी बासनात गुंडाळून ठेवलेली हि योजना आता बाहेर का काढण्यात आली आहे? कोणकोणत्या गुंडांच्या टोळ्या पोसायचे आहेत ? असा सवाल हि आता भाजप कार्यकर्त्यांच्या समवेत अजित पवारांचे कार्यकर्ते देखील करू लागले आहेत.सध्या ५ रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर हि योजना राबवून वाहतुकीची कोंडी कमी करण्याचा जाब गजब दावा महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. आणि पुढे संपूर्ण महापालिका हद्दीत असे पे -पार्क चे ठेके अनेक मुख्य रस्तोरस्ती देऊन नागरिकांचे खिसे खाली करण्याचा डाव देखील आखला जातो आहे. नागरीकांकडून कर ,टॅक्स तरी कुठे कुठे किती कसा वसूल करणार किती लुटणार ? असा सवाल आता येत्या निवडणुकीत न झाला तर नवलच वाटेल अशी स्थिती आहे.
या योजनेसाठी काही आकर्षणे दाखविण्यात येत आहेत ती अशी –ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना आपली गाडी कुठे पार्क करता येईल, हे समजावे, यासाठी या रस्त्यांवर ‘डिजिटल स्क्रीन’ लावण्यात येणार आहेत. प्रत्येकी अडीचशे मीटर जागेवर लावलेल्या या स्क्रीन्सवर जवळपास कुठे पार्किंग उपलब्ध आहे हे समजणार आहे. त्यामुळे नागरिकांना गाडी पार्क करणे सोपे जाणार आहे.शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस संयुक्तरीत्या प्रयत्न करीत आहेत. शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासह वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्त उभे राहणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्यात येणार आहे. महापालिकेचे सभागृह अस्तित्वात असतानाच सुमारे सात वर्षांपूर्वी या संदर्भातील ठराव लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे.यानुसार लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रोड आणि जंंगली महाराज रस्ता, विमाननगर, बाणेर येथील हायस्ट्रीट आणि बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्ता या रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबवली जाईल. त्यासाठीची निविदाप्रक्रिया सुरू असून, यासाठीची निविदापूर्व बैठकही नुकतीच पार पडली. तीन डिसेंबर रोजी यासाठीच्या निविदा सादर करण्याची अंतिम मुदत असून, चार डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत.या रस्त्यांवर पार्किंगसाठी रस्त्यावर पट्टे (मार्किंग) करणे, चारचाकी, दुचाकी पार्किंगसाठीचे फलक लावणे आदी कामे केली जातील; याशिवाय या संदर्भातील अधिसूचना काढण्यासाठीचे पत्र वाहतूक पोलिसांकडे दिले आहे. पार्किंगचा ठेका मिळणाऱ्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अधिकृत गणवेश व महापालिकेने मान्यता दिलेले अधिकृत ओळखपत्र असणे बंधनकारक असेल.
‘पे अँड पार्क’मधील रस्ते हे दीड ते तीन किलोमीटर लांबीचे आहेत. त्यामुळे कुठे गाडी लावण्यासाठी जागा आहे, कुठे दुचाकी आणि कुठे चारचाकी लावता येईल, हे नागरिकांना समजणे अवघड आहे. त्यामुळेच या रस्त्यांवर प्रत्येक अडीचशे मीटर अंतरावर ‘डिजिटल स्क्रीन’ लावल्या जातील. यात त्या वेळी गाडी लावण्यासाठी कुठे जागा उपलब्ध आहे, हे सहज समजेल. त्यानुसार वाहनचालक वाहन पार्क करू शकतील.

