प्रख्यात निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांचे मत ; ग्रंथ पारायण दिंडी पुणे च्यावतीने अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : रामायण हा प्रभू श्रीरामाच्या जीवनाचा प्रवास नसून, सदाचार, कर्तव्यभावना आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश देणारा जीवनमार्ग आहे. आजच्या काळातील पिढीला रामायण ही फक्त प्रभू श्रीरामाची गोष्ट वाटते. मात्र रामायण म्हणजे केवळ कथा नसून श्रीरामाने आचरणात आणलेला आदर्श मार्ग आहे, असे मत निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांनी व्यक्त केले.
ग्रंथ पारायण दिंडी पुणे च्यावतीने अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती, चातुर्मासातील व्रताची सांगता आणि घरोघरी रामरक्षा स्तोत्र पठाणाच्या संकल्पपूर्ती निमित्त सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, रा.स्व.संघ कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, डाॅ. संजीव डोळे, संस्थेचे विरेंद्र कुंटे, नंदकुमार देव आदी उपस्थित होते. यावेळी देव, देश आणि धर्मासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि शालेय संस्थांचा सन्मान करून त्यांना मदतनिधी प्रदान करण्यात आला. श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्था पुणे व चौफेर प्रतिष्ठान यांचे सहाय्य लाभले.
डॉ. धनश्री लेले म्हणाल्या, जीवनात वेळेचे खूप महत्व सांगितले आहे. जर आपण ठराविक वेळेनुसार आहार घेतला तर शरीरात जैविक घड्याळे तयार होतात आणि त्या विशिष्ट वेळीच आपल्याला भूक लागते. म्हणून उपासना देखील ठराविक वेळेला केल्यास मनालाही त्या वेळेची सवय लागते आणि उपासनेची भूक निर्माण होते. ज्या वेळेला आपण नियमित उपासना करतो, त्या वेळेला परमेश्वरही आपल्या भक्तीची वाट पाहतो. आपण त्यावेळेला उपासना न केल्यास परमेश्वरच आपल्या नावाने हाक मारतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रशांत यादव म्हणाले, आपल्या ग्रंथांमध्ये कर्तव्याचा स्पष्ट उपदेश देण्यात आला आहे. देव, देश आणि धर्म ही जीवनशैली प्रत्येकाने मनापासून स्वीकारली पाहिजे आणि ती दैनंदिन व्यवहाराचा भाग झाली पाहिजे. जर प्रत्येकाने या मूल्यांचे पालन केले तर भारताला महासत्ता होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. कृषीकेश रावले म्हणाले, या अशा संस्थांच्या कार्याची प्रेरणा घेवून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून काम केले पाहिजे. मी देखील पुणे शहरासाठी काम करताना तुमच्याकडून येणाऱ्या सूचनांचा स्विकार करून काम करीन, असेही त्यांनी सांगितले.
विरेंद्र कुंटे म्हणाले, अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती, चातुर्मासातील व्रताची सांगता आणि घरोघरी रामरक्षा स्तोत्र पठाणाच्या संकल्पपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त प्रत्येक घरात रामरक्षा पठण झाले पाहिजे या संकल्पाची पूर्ती झाली असली तरी देखील पुढे देखील ते कार्य असेच सुरू रहावे व जास्तीत जास्त नागरिक या संकल्पात जोडले जावेत असे प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. अलका विंझे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. विरेंद्र कुंटे यांनी आभार मानले.

