पुणे दि. 25 : दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस २०१५ पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस विशेषत्वाने पाळला जातो. यावर्षीही २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा मध्ये संविधान दिन साजरा करण्याच्या सूचना श्री. राहुल रेखावार,संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी केल्या आहेत.
२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाशी सुसंगत पुढीलप्रमाणे उपक्रम राबवावेत. यात संविधान प्रभात फेरी, संविधान व्याख्यानमाला- सेमिनार, संविधान विषयक चित्रकला पोसटर स्पर्धा, संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, संविधान विषयक पथनाट्य, पोवाडा-गणी सादरीकरण, मानवी साखळी निर्मिती, हस्तकला स्पर्धा आदि स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. तसेच संवैधानिक मूल्यांवर शपथवाचन,संविधान प्रस्तावनेचे वाचन,लोकशाही मूल्यांवरील चित्रकला, निबंध, घोषवाक्य स्पर्धा,संविधान विषयक व्याख्यान, परिसंवाद,न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता याबाबत चर्चा सत्रे इ. उपक्रम राबवावेत.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्वाची जाणीव, सामाजिक जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्यांची दृढ स्थापना होईल. परिणामी संविधान दिन हा मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा प्रभावी दिवस ठरेल असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, यांनी आपल्या परिपत्रकात नमुद केले आहे.

