पुणे-पुणे मार्केट यार्डातील शेवग्याची आवक तब्बल 90 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे शेवग्याने चिकनला मागे टाकत बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सध्या पुण्यात चिकन 220 ते 250 रुपये किलोने मिळतंय, तर शेवगा मात्र 400 ते 500 रुपये किलोने विकला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात शेवग्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे सोलापूरसह अनेक भागांतील शेवग्यांचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शेवग्याचा यंदाचा हंगाम विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. एरवी घाऊक बाजारात दररोज 4 ते 5 हजार किलो शेवग्याची आवक होत असते. पण सोमवारी केवळ 400 ते 500 किलो शेवगा आला. ही अल्पशी आवक केवळ आंध्र प्रदेशातून आली. यामुळे गत आठवड्यात जो शेवगा 140 ते 150 किलो दराने मिळत होता. तो आता थेट 500 रुपयांवर पोहोचला आहे.
घाऊक बाजारात 10 किलो शेवग्याला 3000 चा भाव मिळत आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडत संघटनेचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ आणि ज्येष्ठ व्यापारी रामदास काटकर यांनी ही माहिती दिली. मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी झाल्यामुळे ही दरवाढ झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईसह राज्यभरातील दाक्षिणात्य उपहारगृह चालकांकडून सांबार, रसमसाठी शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते. दररोज मोठी खरेदी करणारे हे व्यावसायिक आता वाढलेल्या दरामुळे चिंतेत सापडले आहेत.
शेवगा उष्ण असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत गृहिणींकडून शेवग्याला मोठी मागणी असते. मधुमेह व इतर आजारांसाठीही शेवगा गुणकारी असल्याने त्याचा वापर वाढला आहे. त्यातच आता शेवग्याला सोन्याचा भाव आल्यामुळे ही आरोग्यदायी भाजी आता सर्वसामान्यांच्या ताटातून हद्दपार होण्याची भीती वाढली आहे.

