पुणे दि. 25 : डेहराडून, उत्तराखंड येथे आयोजित २८ व्या अखिल भारतीय वन क्रीडा संमेलन २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्राने या स्पर्धेत ३१ सुवर्ण, २६ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ७७ पदके जिंकत २८६ गुणांसह देशात चौथे स्थान पटकावले. तसेच राज्यातील १३ क्रीडापटूंनी चौथे स्थान मिळवत भक्कम कामगिरीची नोंद केली.
रायपूरमध्ये पार पडलेल्या २७ व्या AIFSM 2024 मधील ८ व्या स्थानावरून महाराष्ट्राने यंदा थेट ४ थ्या स्थानावर झेप घेतली आहे.
या यशात राज्यातील ४ वन प्रशिक्षण संस्था आणि २ वन अकादमींतील प्रशिक्षणार्थींचा मोलाचा वाटा असून त्यांनी एकूण २७ पदके मिळवली. विविध ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये—धावणे, लांब पल्ला, रिले, मॅरेथॉन, लांब उडी, रेस वॉक, आलाफेक, भारोत्तोलन आणि पॉवरलिफ्टिंग—यामध्ये प्रशिक्षणार्थींनी ९ सुवर्ण, १० रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली.
एकूणच, महाराष्ट्र वन विभागाच्या प्रशिक्षणार्थींच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र वन विभाग शिक्षण आणि प्रशिक्षण शाखेतर्फे सर्व विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक व प्रशिक्षण संस्थांचे अभिनंदन करण्यात आले.

