दी प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) वेल्फेअर असोसिशनच्याअध्यक्षपदी उदयन माने; सचिवपदी मनीष दीडमिसे
पुणे: बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या हितासाठी कार्यरत दी प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी उदयन माने, उपाध्यक्षपदी तनुज नगरानी व नीरज सिंग, सचिवपदी मनीष दीडमिसे, तर खजिनदारपदी मुरली रमणी यांची निवड झाली आहे. २०२५-२०२७ या कालावधीसाठी ‘प्रॉप’च्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये संचालक म्हणून ऍड. महेश यादव (प्रॉप ग्रोथ), दिनेश राठी (प्रशिक्षण व मेंटरशिप सर्कल्स), विक्रम मलिक (बिझनेस एक्स्चेंज व क्रॉस सेल), सारंग मद्रेवार (क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम), रवींद्र यादव (डिजिटल, पीआर व मीडिया) आणि प्रीत कोहली (इव्हेंट्स, एंगेजमेंट व नेटवर्किंग) यांची नियुक्ती झाली. मावळते अध्यक्ष दर्शन चावला, संस्थापक अध्यक्ष किशन मिलानी, खालिद मेनन सल्लागार मंडळात, तर ‘एनएआर इंडिया’चे चेअरमन रवी वर्मा मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहतील.
उदयन माने म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी ‘प्रॉप’ ही संस्था नॅशनल असोसिएशन ऑफ रिअल्टर्स-इंडियाशी संलग्नित आहे. पुणे हे बांधकाम क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असलेले शहर आहे. त्यामुळे रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमाणित सदस्यांची डायरी आणि घर खरेदी-विक्री प्रक्रियेत ग्राहकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी जनजागृती सत्रांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विकसक, कायदा विशेषज्ञ आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल.”
‘प्रॉप’चे सर्व सदस्य ‘रेरा’ नोंदणीकृत असून त्यांनी ‘रेरा’ परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. हे सर्व सदस्य विविध शहरांत रिअल इस्टेट सेवा देण्यास सक्षम आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे सदस्यांना जागतिक सर्वोत्तम पद्धतींची ओळख होते. तसेच ‘नरडेको’ आणि ‘क्रेडाई’ यांच्याशी असलेल्या द्विपक्षीय संलग्नतेमुळे उद्योगातील समन्वय आणि धोरणात्मक संवाद अधिक मजबूत झाला आहे, असेही उदयन माने यांनी नमूद केले.
‘प्रॉप’चे स्वतःचे प्रशिक्षण केंद्र असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिअल इस्टेटमार्फत (आयआयआरई) सदस्यांसाठी विशेष कौशल्य-वृद्धी कार्यक्रम राबवले जातात. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेवर व सुबद्ध निराकरण करण्यासाठी ‘प्रॉप’ने स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा देखील विकसित केली आहे. पारदर्शक व्यवहार, माहितीपूर्ण ग्राहक व प्रशिक्षित रिअल इस्टेट सल्लागार तयार करण्यासह ग्राहकांचा विश्वास दृढ करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे दर्शन चावला यांनी सांगितले.

