‘त्रिवेणी’ मैफलीतून साधला सुमधुर संगीत योग
ऋत्विक फाऊंडेशनतर्फे विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन
पुणे : हार्मोनिमय वादनातून साकारलेले नादमधुर सूर, रूद्र वीणेतून निर्मित झालेले धीरगंभीर स्वर आणि नादमाधुर्य दर्शविणारे बासरीचे सुमधुर गुंजन यातून एका अनोख्या संगीत योगाची पर्वणी रसिकांना मिळाली.

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्आयोजित ‘त्रिवेणी’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमात हार्मोनियम वादक मिलिंद वासुदेव, भारतातील पहिल्या रुद्र वीणा वादक ज्योती हेगडे यांच्यासह प्रसिद्ध बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांची सांगीतिक मैफल रंगली. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् येथे या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
मिलिंद वासुदेव यांनी हार्मोनियम वादनातून मधुवंती रागाचे माधुर्य साकारताना सुरुवातीस धृपद अंगाने आलाप, जोड आलाप आणि जोड झाला सादर करत मध्यलय रूपकमधील एक गत तसेच मध्यलय तीन तालातील एक गत घेऊन अतिद्रुत तीन तालामध्ये झाला सादर केला. या सादरीकरणात पारंपरिक पद्धतीची वाट न चोखाळता मिलिंद वासुदेव यांनी धामा या वाद्याबरोबर जोड आलाप आणि जोड झालाचे सादरीकरण रसिकांना विशेष भावले. त्यांना आशय कुलकर्णी (धामा आणि तबला), स्वरा किरपेकर (तानपुरा), नचिकेत हरिदास (स्वरमंडल) यांनी समर्पक साथसंगत केली.
भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील पहिल्या रुद्र वीणा वादक म्हणून ख्याती प्राप्त विदुषी ज्योती हेगडे यांनी रुद्र वीणा या प्राचीन वाद्याचे वैशिष्ट्य सांगून वादनाची सुरुवात राग यमनने केली. त्यानंतर दुर्गा सादर केला. रुद्र वीणेतून साकारणाऱ्या धृपद शैलीच्या सूरांशी तादात्म्य होताना रसिकांना अद्भुत ध्यानावस्थेची अनुभूती आली. ज्योती हेगडे यांनी वीणा वादनाची सांगता चौतालमधील बंदिशीने केली. अनुजा बोरुडे-शिंदे यांनी पखवाजवर दमदार साथ करत मैफलीत रंग भरले.
विख्यात बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या बासरी वादनाची सुरुवात राग बागेश्रीने केली. सुरुवातीस पखवाजच्या साथीने त्यांनी तंत्रकारी अंगाने सुरेल बासरी वादन केले तर तबल्याच्या साथीने वादन करताना पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी गायकी अंगाने बासरी वादन करून दोन्ही शैलींवरील प्रभुत्व दर्शविले. बागेश्री रागाचे सौंदर्य उलगडताना पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी बडे गुलाम अली खान यांचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या जागांचे मोहक दर्शन घडविले. कार्यक्रमाची सांगता करताना पंडित पन्नालाल घोष यांनी आपल्या बासरी वादनातून अजरामर केलेल्या बंदिशीचे स्वर्गीय स्वर पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरीतून प्रभावीपणे उमटले. ऋषिकेश जगताप (तबला), मोहित पुराणकर (बासरी), ऋग्वेद जगताप (पखवाज) यांनी आपल्या प्रभावी साथीतून मैफल उत्तरोत्तर रंगवत नेली.
रसिकांनी या तिनही वादकांना भरभरून दाद देत मैफलीचा स्वराविष्कार अनुभवला.
कलाकारांचे स्वागत ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्च्या संचालिका चेतना कडले यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले.

