ठाणे -मुंबई आणि ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पुन्हा उफाळलेला आहे. हिंदी सक्तीबाबतचा निर्णय, त्यानंतरचे सामाजिक वाद आणि त्यावरून वाढणारा तणाव यामुळे अनेक ठिकाणी वातावरण तापलेले दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक 2 वरील गांधीनगर भागात घडलेली एक घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. येथे काही परप्रांतीय तरुणांनी एका किरकोळ वादातून मराठी तरुणाशी अर्वाच्य भाषेत बोलत गोंधळ घातल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या तरुणांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अविनाश जाधव यांच्याबद्दलही अत्यंत विटंबन करणारे शब्द वापरल्याचे समोर आले आहे.
ही संपूर्ण घटना एका वाहन पार्किंगच्या वादातून सुरू झाली. स्थानिक माहितीनुसार, गाडी लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला सामान्य शब्दांचा वाद झाला. मात्र हा वाद काही क्षणांतच गंभीर वळणाला गेला. घटनेत सहभागी असलेल्या काही परप्रांतीय तरुणांनी दारूच्या नशेत मराठी तरुणाला दमदाटी केली आणि अपमानकारक शिव्या दिल्या. ये ठाणे का गांधीनगर है, यहां भैय्याओं का राज चलता है… अशा शब्दांत त्यांनी आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव… अशा अत्यंत निंदनीय पद्धतीने मनसे नेतृत्वाचा उल्लेख केला असल्याचेही सांगण्यात येत आहे.
घटनेदरम्यान या तरुणांनी मराठी युवकाला अक्षरशः हुसकावून लावल्याचे व्हिडीओमध्ये दिसले. इधर कोई भी मराठी आया तो उसकी… अशा धमकीच्या भाषेत बोलून त्यांनी परिसरातील वातावरण आणखी बिघडवले. काही तरुण दारूच्या नशेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही घटना घडत असतानाच काहींनी व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि काही तासांतच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर राज्यभरातील मनसैनिक आणि स्थानिक मराठी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.
या घटनेनंतर गांधीनगर परिसरात तणावाचे सावट निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून आरोपी तरुणांना शोधून काढण्याची मागणी केली जात आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संघटनांनीही या प्रकाराला विरोध दर्शवला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, एखादा वाद एवढा वाढवून त्यात जातीय किंवा प्रांतीय रंग देणे हा चिंतेचा विषय आहे. मराठी अथवा परप्रांतीय कोणताही असो, हिंसाचार किंवा धमकावणे हा उपाय नाही, असे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, राजकीय पातळीवरही या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. मनसे कार्यकर्ते संतप्त असून अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी ते करत आहेत. व्हिडीओमधील सर्व तरुणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे. शहरात शांतता बिघडू नये यासाठी पोलिसांनी गांधीनगर परिसरात गस्त वाढवली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबई आणि ठाण्यातील मराठी-परप्रांतीय तणाव समोर आला असून प्रशासनाला ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक दक्ष राहावे लागणार आहे.

