पुणे : मित्राचे लग्न असताना मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावे, यासाठी त्याचे घरातून अपहण करुन दोन पिस्तुलं काढून त्याच्या डोक्याला लावून ‘‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,’’ अशी धमकी देणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्र्वेतांग निकाळजे याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याकडून २ पिस्टल जप्त केले आहेत.
श्र्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. भीमनगर, मंगळवार पेठ) आणि ओम संजय गायकवाड (वय २६, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.श्र्वेतांग निकाळजे याची मंगळवार पेठ, तसेच भारती विद्यापीठ भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा पिस्तुल बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे निकाळजे याच्याविरुद्ध फरासखाना, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. येरवडा कारागृहात काही वर्षांपूर्वी निकाळजे आणि साथीदारांनी सांगलीतील एका गुंडावर हल्ला केला होता. या घटनेत गुंड गंभीर जखमी झाला होता. शिवाजीनगर न्यायालयासमोर निकाळजे आणि साथीदारांनी एका साक्षीदारावर पिस्तुलातून गोळीबार केला होता.
याबाबत शिवा धनराज मुत्याळ (वय ३१, रा. धाबाडी, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचा सिंहगड कॉलेज परिसरात स्टॉल असून त्यांनी व निकाळजे यांनी एअरटेल कंपनीचे टॉवरचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. त्याचे पैसे द्यावेत, यासाठी शिवा मुत्याळ याचे लग्न असताना दोन साथीदारांच्या मदतीने श्र्वेतांग निकाळजे याने ८ नोव्हेबर रोजी रात्री पावणे बारा वाजता त्याचे अपहरण केले होते. भोर रोडवर उतरुन त्याच्याकडील दोन पिस्टल काढून ते फिर्यादीच्या डोक्यावर लावून ‘‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,’’ अशी धमकी दिली होती. इतर दोघा साथीदारांनी ‘तू भाऊचे ऐकत नाहीस तुझ्या डोक्यात कोयता टाकतो,’ अशी धमकी दिली होती. त्यांच्या तावडीतून ते पळून गेल्याच्या रागातून त्या तिघांनी त्यांना शिवाजीनगर येथे गाठून मारहाण करुन पिस्टल लावून धमकाविले होते. याबाबतचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीवरुन पोलिसांनी श्र्वेतांग निकाळजे आणि ओम गायकवाड यांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर निकाळजे याच्याकडून २ पिस्टल व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ६ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली आहे.

