बीड-एका 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. विशेष म्हणजे बलात्काराची घटना घडल्यानंतर गावातील काही लोकांनी सदर मुलीला तब्बल 4 दिवस उपचारासाठी जाऊ दिले नाही. तसेच तिच्या आईवरही या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला. पण अखेर आपल्या मुलीची वेदना पाहून या महिलेने पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
यासंबंधीच्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथील एका 3 वर्षीय चिमुकलीवर नुकताच बलात्कार व हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले असताना आता बीड जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील ताज्या घटनेत एका 5 वर्षीय लैंगिक अत्याचार झाला आहे. नात्यातीलच एका मुलाने हा घात केला आहे. पीडित मुलीवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना गत 11 नोव्हेंबर रोजी घडली. पण ती आज समोर आली.
ही घटना घडल्यानंतर गावातील काही नागरिकांनी पीडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणी बदनामी टाळण्यासाठी त्यांनी चक्क 4 बैठका घेतल्या. या कालावधीत मुलगी तशीच तडफडत आपल्या घरी होती. ग्रामस्थांनी तब्बल 4 दिवस तिला घरीच रोखून धरले. पण मुलीच्या नातलगांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी थेट पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क् साधला. त्यानंतर वेगाने सूत्रे हालत शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 4 दिवस वेदना असह्य झाल्यानंतर अखेर मुलीच्या आईने उपचारासाठी बीड गाठले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित मातेला झाला प्रकार सांगताना अश्रू अनावर होत होते.
दुसरीकडे, बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी या प्रकरणी शिरूर कासार पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची आपबिती सांगताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. विशेषतः या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या शिरूर कासार पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे. पीडित मुलीच्या आईवर नातेवाईक व गावकऱ्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला होता. पण मुलीची आई मॅनेज झाली नाही. त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला, असे ते म्हणाले.

