पुणे-अपोलो हॉस्पिटल्सने पुण्याच्या स्वारगेट परिसरात आपले नवे अत्याधुनिक रुग्णालय सुरू केले आहे. महाराष्ट्रातील हे अपोलोचे तिसरे, तर पुण्यातील पहिले रुग्णालय आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर येथे ४०० बेड्स उपलब्ध होतील, सध्या पहिल्या टप्प्यात २५० बेड्स कार्यान्वित करण्यात आले आहेत.
हे रुग्णालय क्वाटर्नरी केअर (अतिविशेष दर्जाची वैद्यकीय सेवा) पुरवणार आहे. हृदयरोग, कर्करोग, न्यूरोसर्जरी, ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया यासारख्या जटिल उपचारांसाठी हे विशेष सुसज्ज असेल. पुण्याच्या वेगाने बदलत्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन अपोलोने हा विस्तार केला आहे.
अपोलो हॉस्पिटल्सचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रताप रेड्डी यांनी यावेळी सांगितले की, “भारताला जागतिक आरोग्यसेवेचे केंद्र बनवणे हे आमचे स्वप्न आहे. ‘हील इन इंडिया, हील बाय इंडिया’ या दृष्टिकोनातून आम्ही जगातील रुग्णांना भारतातच उत्कृष्ट उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहोत. पुणे आणि परिसरातील प्रत्येक कुटुंबात आरोग्यदायी असावे अशी आमची इच्छा आहे.”
कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. प्रीता रेड्डी म्हणाल्या, “चार दशकांहून अधिक काळाचा अपोलोचा वारसा आता पुण्यात अवतरला आहे. क्लिनिकल उत्कृष्टता, करुणामय देखभाल आणि सतत नावीन्य यावर आमचा भर आहे.” व्यवस्थापकीय संचालिका सुनीता रेड्डी यांनी नमूद केले की, “पुणे हे भारतातील सर्वात वेगाने वाढणारे आरोग्य बाजारपेठ आहे. येथे अपोलोची संपूर्ण एकात्मिक आरोग्य परिसंस्था आणून आम्ही अधिकाधिक लोकांना उच्चस्तरीय क्वाटर्नरी केअर उपलब्ध करून देणार आहोत.”
समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मधू ससिधर यांनी सांगितले की, हे रुग्णालय रुग्ण-केंद्रित संस्कृती, पुराव्यावर आधारित वैद्यकीय पद्धती आणि सुरक्षिततेवर आधारित आहे. पुणे रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा कर्माकर यांनी सांगितले की, “आयटी व इनोव्हेशनचे केंद्र असलेल्या पुण्याच्या प्रगतीत अपोलो आता सहभागी होत आहे. पुणे-मुंबई-पनवेल पट्ट्यातील रुग्णांना आता जगातील सर्वोत्तम उपचार घराजवळ मिळणार आहेत.”

