एमआयटी डब्ल्यूपीयूत
३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन
डॉ. प्रमोद काळे यांना समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत
पुणे, दि.२५ नोव्हेंबर “अवकाश विज्ञान आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देत असल्यामुळे देशांमध्ये शांततापूर्ण संबंध निर्माण होण्यास मदत होते. मनुष्याला जन्मतःच अंतराळाबद्दल प्रचंड आकर्षण राहिले आहे. कालानुसार अंतराळ क्षेत्राबद्दल होणारा विकास अंतराळातील संशोधन, संप्रेषण, अंतराळातील मानवी उपस्थिती, संशोधन व अध्ययन या सर्व गोष्टी मानवाच्या उत्थानासाठी व शांती मिळण्यासाठी महत्वपूर्ण आहे. यामध्ये होणारे बदल आता मानवाच्या नजरेतून सूट शकत नाहीत.” असे विचार स्पेस अॅप्लिकेशन सेंटर इस्त्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ.प्रमोद काळे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधित आयोजित ३०वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी नवी दिल्ली येथील आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी.के.भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी व व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
ही व्याख्यानमाला माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे.
या प्रसंगी पद्मश्री डॉ.प्रमोद काळे यांना मान्यवरांच्या हस्ते समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पद्मश्री डॉ.प्रमोद काळे म्हणाले,” अवकाशातून पृथ्वी अवलोकन करतांना जमीन आधारित, हवाई आणि उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वी वरील पाणी व वायुमंडलाची माहिती एकत्रित करणे. प्राकृतिक घटना, संकट आणि मानवीय गतिविधिंवर नजर ठेवली जाते. अंतराळ संप्रेषणामध्ये संप्रेरण उपग्रह, ग्राउंड स्टेशन आणि डीप स्पेस नेटवर्क सारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. अंतराळातील वेगवेगळ्या बिंदूमधील किंवा पृथ्वी आणि अवकाशातील माहिती व डेटाचे प्रसारण केले जाते.”
“अंतराळातील वातावरण हे पृथ्वीवरील वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यात हवा नाही व्हॅक्यूम आहे, प्रचंड तापमान आणि रेडिएशनसारखे अनेक धोके आहेत. हे वातावरण गुरूत्वाकर्षण, रेडिएशन, सूक्ष्म उल्कापिंडापासून बनलेले आहे.”
डॉ. सी.के.भारद्वाज म्हणाले,” सध्या संपूर्ण जगात अध्यात्म आणि शांतीची गरज आहे. अध्ययन क्षेत्रामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची संकल्पना रुजविणे गरजेचे आहे. मानव जातीच्या व स्वतःच्या उत्थानासाठी युनिवर्सलमधील उर्जेचा योग्य वापर करावा. कोणत्याही सृजनात्मक निर्मितीसाठी व कार्यासाठी उर्जा अत्यंत आवश्यक असते. बॉडी, माइंड अॅण्ड सोल या तीन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” रामेश्वर येथे निर्मित करण्यात आलेल्या विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनातून जगाला विश्वशांती आणि विश्व कल्याणाचा संदेश दिला जात आहे. आज तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देश्याने ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. येथे सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वर पूजा आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. मिलिंद पात्रे यांनी व्याख्यानमालेची पार्श्वभूमी सांगितली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रत्नदीप जोशी यांनी आभार मानले.

