‘”नागरिकांनी आपली कुत्री मोकाळ्या ठिकाणी सोडू नयेत. पहाटे शौचास जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. आम्ही बिबट्यांचा शोध घेत आहोत.थर्मल ड्रोन’च्या माध्यमातून शोध मोहीम सुरू करण्यात येत आहे.;मनोज बारबेले , वन परिक्षेत्र अधिकारी

पुणे:
जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या दहशत वाढली असतानाच, आता शहरातही बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. औंध परिसरातील रहिवाशांना आज पहाटेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटीच्या आसपास हा बिबट्या फिरताना दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

सकाळी नागरिकांनी ही माहिती देताच पुणे वन विभाग तातडीने सतर्क झाला. लगेच RESQ CT टीमसह संयुक्त पथक औंधमध्ये दाखल झाले. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी सर्व तांत्रिक साधनांचा वापर सुरू असून, पथके पूर्ण तयारीत आहेत. बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी सापळे आणि आवश्यक उपकरणांसह सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, परिसरातील सर्व सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना सावध राहणे आणि पाळीव प्राण्यांना मोकळे न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४ नंतर बिबट्याचे कोणतेही दर्शन झालेले नाही. तरीही पथके रात्रीदेखील परिसरात शोध व देखरेख ठेवणार आहेत. कॅमेरे, ट्रॅप आणि पथकांची गस्त याद्वारे बिबट्याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर वनविभागाचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगण्यात आले.
औंधसारख्या व्यस्त आणि दाट वस्तीच्या शहरभागात बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली असून वनविभागाची कारवाई निर्णायक ठरणार आहे.
रविवारी पहाटे औंध येथील ब्रेमेन चौक परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभाग आणि वन्यजीव बचाव पथकांनी तत्काळ शोध मोहीम राबवली. बिबट्या पहाटे चार’च्या सुमारास दिसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
त्यानंतर नागरिकांना प्रत्यक्ष कुठेही बिबट्या दिसून आला नाही. परिसरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता, बिबट्या दिसून आल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

वन विभागाच्या वतीने रविवारी रात्री उशीरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध, बाणेर, चतु: श्रुंगी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

