पुणे : सुश्राव्य, सुमधुर गायन त्याला संयमित तबला वादनासह मोहक संवादिनीच्या सुरावटींची लाभलेली साथ अशा सांगीतिक मैफलीचा आनंद आज रसिकांना मिळाला. निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित डॉ. रेवती कामत यांच्या शास्त्रीय गायन मैफलीचे.
स्वरमयी गुरुकुल, संभाजी उद्यानासमोर येथे आज (दि. २३) या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. रेवती कामत यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग ललतमधील गुरू डॉ. अश्र्विनी भिडे-देशपांडे रचित ‘हो नंदलाल’ या विलंबित एक तालातील रचनेने केली. यानंतर डॉ. प्रभा अत्रे यांचे सांगीतिक विचार मांडत डॉ. रेवती कामत यांनी डॉ. प्रभा अत्रे यांची ‘नम जपत बार बार, हे गोपाल हे दयाल’ ही भक्तिभावपूर्ण बंदिश सुमधुरपणे सादर केली.
डॉ. कामत यांनी जौनपुरी राग सादर करताना दोन बंदिशी ऐकविल्या. यात झपतालातील ‘मानो जरा नित दिन’ तसेच ‘पायल बाजन लागी रे अब’ यांचा समावेश होता. ‘अब मोरी बात मान ले पिहरवा’ ही राग शुद्ध सारंगमधील बंदिश प्रभावीपणे सादर करून त्यांनी रसिकांना आनंदित केले.
मैफलीची सांगता भैरवीने करताना डॉ. रेवती कामत यांनी सुप्रसिद्ध ऐतिहासिक कवी, संगीतकार अमीर खुसरो यांनी रचलेल्या जीवनाचे वास्तव दर्शविणाऱ्या ‘बहुत रही बाबुल घर’ या रचनेतील अर्थपूर्णता प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचविली.
डॉ. रेवती कामत यांना भरत कामत (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), ओजस्वी वर्टीकर (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत स्वरमयी गुरुकुलचे सल्लागार भरत वेदपाठक यांनी तर सूत्रसंचालन पल्लवी घोडके यांनी केले.

