गानवर्धन प्रस्तुत विशेष संगीत मैफल
पुणे : सकाळचे प्रसन्न वातावरण अधिक उत्साही करणाऱ्या राग जौनपुरी आणि राग भटियारमधील गायन – वादनाने रविवारी सकाळी रसिकांना सुरेल मेजवानी मिळाली आणि ‘गानवर्धन’ आयोजित स्वरसुमनांजली मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
गानवर्धन प्रस्तुत आणि रसरंग गुरुकुलाच्या साह्याने ज्येष्ठ गायक, गुरू, रचनाकार, लेखक कै. पंडित बबनराव हळदणकर यांच्या स्मरणार्थ शास्त्रीय गायन – वादनाच्या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीत रसिकांनी पं. हळदणकर यांचे शिष्य पंडित चंद्रशेखर महाजन यांचे गायन तर पंडित रत्नाकर गोखले यांच्या व्हायोलीन वादनाचा आस्वाद घेतला. नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात रविवारी सकाळी ही मैफल झाली.
गानवर्धन संस्थेतर्फे आयोजित स्वरसुमनांजली मैफलीची संकल्पना रसरंग गुरुकुलची होती. पंडित बबनराव हळदणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित चंद्रशेखर महाजन यांनी राग जौनपुरीने सुरुवात केली. झुमरा तालात निबद्ध ‘ऐसो अब रंग धुलिया’ ही पारंपरिक रचना आणि त्याला जोडून मध्यलय त्रितालातील ‘तान पेहेले’ ही मनरंग यांची बंदिश त्यांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी उस्ताद विलायत हुसेन खाँ रचित राग कुकुभ बिलावलमधील ‘प्राणपिया तेरो रंगरूप छब देखत’ ही त्रितालातील बंदिश पेश केली. मोजक्या वेळात प्रभावी गायनाचा प्रत्यय त्यांनी दिला. त्यांना दत्तात्रेय भावे (तबला), ओजस रानडे (संवादिनी), मयूर कोळेकर (तानपुरा व स्वरसाथ) यांनी साथसंगत केली.
मैफलीच्या उत्तरार्धात आकाशवाणीवरील ज्येष्ठ व्हायोलीनवादक पंडित रत्नाकर गोखले यांचे वादन झाले. विदुषी माणिक वर्मा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिवादन म्हणून माणिकताईंनी लोकप्रिय केलेला राग भटियार त्यांनी प्रस्तुत केला. या रागात रूपक, त्रिताल आणि एकतालातील रचनांचे त्यांनी प्रत्ययकारी सादरीकरण केले. संगीत मानापमान नाटकातील ‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी’ हे नाट्यपद सादर करून, रागमाला पेश करत त्यांनी वादनाची सांगता केली. रागमालेचे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यामध्ये हिंडोल, भूप, बिलावल, शंकरा, देस, तिलककामोद, बसंत, श्री, मारवा, पूरिया, भैरव, गुजरी तोडी, मालकंस, भैरवी, जौनपुरी, सारंग आणि काफी अशा रागांचा समावेश होता. त्यांना आदित्य देशमुख यांनी तबल्याची पूरक साथ केली. अभिजीत पटाईत यांनी व्हायोलीनवर साथ केली.
याप्रसंगी हळदणकर कुटुंबीयांपैकी उषाताई हळदणकर, पुत्र गौतम हळदणकर उपस्थित होते. तसेच विवेक जोशी, गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, विश्वस्त डॉ. राजश्री महाजनी, सविता हर्षे, सुधीर धर्माधिकारी उपस्थित होते. युवा होतकरू गायक विद्यार्थी तुषार गोरे याला ११ हजार रुपयांची शिष्यवृत्ती उषाताई हळदणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तुषारने स्वरचित बंदिशीचे गायन करत शिष्यवृत्तीचा स्वीकार केला.
डॉ. विद्या गोखले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दयानंद घोटकर स्वागतपर प्रास्ताविकात म्हणाले, पंडित बबनराव हळदणकर हे उच्चविद्याविभूषित प्रतिभावंत गायक, गुरू तर होतेच, पण उत्तम रचनाकार होते. त्यांनी रसपिया या नावाने अनेक बंदिशी रचल्या. मोठा शिष्यपरिवार निर्माण केला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या मैफलीचे आयोजन करण्यात आले.
गौतम हळदणकर म्हणाले, बाबांमध्ये सर्जनशीलतेचे अनेक पैलू होते. बंदिशकार हा त्यापैकी एक पैलू होता. त्यांच्या रचनांचे दोन संग्रह प्रकाशित झाले आहेत. ते उत्तम लेखकही होते. त्यांच्या पुस्तकांनाही पुरस्कार प्राप्त झाले.

