१२८ व्या दत्तजयंती उत्सवानिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे आयोजन ; भारतासह विविध देशांत एकत्रित पठण
पुणे : गुरुदेव दत्त… श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर… च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुणे व जिल्ह्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. त्याचवेळी दत्तचरणी हजारो भाविक मनोभावे नतमस्तक होत होता.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात १२८ व्या दत्तजयंती उत्सवाचे शुभारंभानिमित्ताने करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख चिदानंद अवधूत प. पू. बाबा महाराज तराणेकर (इंदोर), जया तराणेकर, वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प. पू. नारायणरत्न शरदशास्त्री जोशी महाराज, देविदास जोशी, हरी मुस्तीकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, शिरीष पाटुकले, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प. पू. बाबा महाराज तराणेकर (इंदोर) यांचे ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ७५ कमल पुष्पांचा हार, ७५ गुलाबपुष्पांचा गुच्छ देवून तसेच ७५ भगिनींनी त्यांना औक्षण केले. त्रिपदी परिवाराची गुरूपरंपरा दर्शविणारे गुरु श्री दत्तात्रेय, प. पू. टेंबे स्वामी, श्री नाना महाराज आणि श्री बाबा महाराज यांचे एकत्रित भव्य छायाचित्र देण्यात आले. करुणा त्रिपदी आणि श्री दत्त प्रतिकारण स्तोत्र या पुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदींनी उत्सवाचे आयोजन केले आहे. घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
शरदशास्त्री जोशी म्हणाले, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणजे मानवतेची गाथा आहेत. त्यांच्या स्तोत्राचा सामूहिक पाठ केला त्यामुळे त्यांचेही स्मरण यावेळी झाले आहे, असे त्यांनी सांगितले. प. पू. बाबा महाराज तराणेकर म्हणाले, दत्त संप्रदायाची मंदिरे देशभरात आहेत. परंतु श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर हे एकमेव मंदिर आहे जिथे दत्त जयंतीची सुरुवात लोकमंगलवर्धक घोरात्कष्टातच्या सहस्त्र आवर्तनाने होते. ही परंपरा अन्यत्र कोठेही नाही. घोरात्कष्टातचे स्तोत्रपठण हे केवळ आपल्यासाठी नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या शुद्धीकरणासाठीची ही दैवी चिकित्सा आहे.
अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, ट्रस्टचा १२८ वा दत्त जयंती उत्सव या कार्यक्रमाद्वारे सुरु झाला आहे. तब्बल १५ वर्षांपूर्वी या उपक्रमाला प्रारंभ झाला होता. अवघ्या २० ते २५ साधकांसह सुरु झालेला स्तोत्र पठणाचा कार्यक्रम आज महाराष्ट्रासह भारतातील विविध शहरातील शाखांत व ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, ब्रिटन यांसह विविध देशात देखील हे पठण ऑनलाइन पद्धतीने झाले. घोरात्कष्टात हे लोकमंगल वर्धक स्तोत्र अत्यंत लोकप्रिय असून अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत याचा अंतर्भाव असतो. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासक एकत्र यावे आणि सामुहिक उपासना व्हावी, याकरीता स्तोत्र पठण करण्यात आले.
त्रिपदी परिवार पुणे शाखेचे तेजस व भाग्यश्री तराणेकर, हरी मुस्तीकर, श्रीरंग लोंढे, सुभाष कुलकर्णी यांनी आयोजनात सहकार्य केले. विश्वस्त डॉ. पराग काळकर यांनी प्रास्ताविक केले. युवराज गाडवे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.
स्वच्छतादूत अंजली माने यांचा सन्मान
सदाशिव पेठेत कचराकुंडी मध्ये सापडलेले रुपये दहा लाख प्रामाणिकपणे परत केलेल्या तेथील स्वच्छतादूत अंजली माने यांचा ट्रस्ट तर्फे सन्मानचिन्ह व महावस्त्र देवून विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

