जेजुरी: सखी प्रेरणा मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्री हरिद्रामार्चन पूजा व महाआरती तसेच धार्मिक यात्रा शनिवारी श्री क्षेत्र मल्हारगड, जेजुरी येथे अत्यंत भक्तिभावात संपन्न पडली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात, भंडारा खोबऱ्याची उधळण करत आणि धूप–दीपांनी सजलेल्या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिभावाने भरून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. वडगावशेरी मतदारसंघातील तब्बल ५ हजार महिला या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या.
सखी प्रेरणा मंचाच्या उपक्रम मालिकेतील तिसरे पुष्प म्हणून संपूर्ण उपक्रम “महिलांनी महिलांसाठी” या स्वरूपात राबवण्यात आला. पूजेची तयारी, प्रवासाची आखणी, मंदिरावरील व्यवस्था, प्रसाद अशा प्रत्येक गोष्टी महिलांनी स्वतः सांभाळल्याने हा उपक्रम स्त्रीशक्तीच्या संघटनशक्तीचे उत्तम उदाहरण ठरला. या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली असून आयोजकांसाठी तसेच सहभागी महिलांसाठी ही बाब अभिमानाची आहे.
श्री हरिद्रामार्चन पूजा व महाआरती करताना महिलांनी पारंपरिक पद्धतीने सहभाग घेतला. मल्हारी मार्तंडाच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात भंडारा उधळून भक्तिभाव व्यक्त करण्यात आला.
यावेळी सखी प्रेरणा मंचाच्या संस्थापक अध्यक्षा ऐश्वर्या सुरेंद्र पठारे म्हणाल्या, “स्त्री ही संस्कृतीची वाहक आहे. तिच्या मनात श्रद्धा दृढ झाली की घरापासून समाजापर्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मल्हारी मार्तंडाच्या चरणी अर्पण केलेले हे तिसरे पुष्प महिलांच्या भक्तिभावाचे, स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारे ठरले आहे. उपक्रमाची विश्वविक्रमात झालेली नोंद आम्हा सर्व महिलांचा सन्मानच आहे.” या पूजेसाठी डॉ. राजेंद्र खेडकर आणि सौ. मनिषा खेडकर यांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांचे मनःपूर्वक आभार.
श्री क्षेत्र नारायणपूर येथील श्री दत्तांचे तसेच श्री क्षेत्र केतकावळे येथील श्री बालाजींचे दर्शनही यावेळी घेण्यात आले.
“श्रद्धा, संस्कृती, परंपरा, अध्यात्म आणि स्त्रीशक्ती यांचा संगम असलेल्या या उपक्रमाने ऊर्जा मिळाली आहे”, असे मत सहभागी महिलांनी व्यक्त करत सखी प्रेरणा मंचाचे आभार मानले.
सखी प्रेरणा मंचाच्या माध्यमातून या पुढेही महिलांसाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबवले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.

