पुणे : ‘या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’, ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘या व्याकुळ संध्या समयी’, ‘तेथे कर माझे जुळती’, ‘गगन सदन’, ‘मन रानात गेलं ग’, ‘मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात’ अशा मनात घर करून राहिलेल्या अजरामर गाण्यांची संगीत मैफल रसिकांनी अनुभवली. ‘रसिका तुझ्याचसाठी’ या गीताने सुरु झालेल्या या मैफलीची सांगता ‘जरा विसावू या वळणावर’ गाण्याने झाली.
निमित्त होते, वंचित विकास संस्थेतर्फे आयोजित ‘मनात रुजलेली गाणी’ या संगीत मैफलीचे! स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात सुवर्णकाळातील मराठी गीतांची सुरेल मैफल गुंजली. संस्थेचे सभासद, हितचिंतक आणि रसिक श्रोते एकत्र येऊन संस्थेच्या कार्याची ओळख करून घेणे आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणे हा या कार्यक्रमामागील उद्देश होता.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर, वसंतराव देशपांडे, अरुण दाते, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, वसंत प्रभू आदींची मनात खोलवर रुजलेली अजरामर गाणी रंगली. सुधांशु नाईक, आरती परांजपे आणि चैत्राली अभ्यंकर यांनी भावपूर्ण गायनाच्या जोरावर रसिकांना संगीताच्या जादुई प्रवासात नेले. प्रत्येक गाण्याला अनुरूप असे चित्रांकन आणि ओघवते निवेदन यामुळे सादरीकरणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता.
याप्रसंगी संस्थेच्या कार्यवाह संचालिका मीनाताई कुर्लेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. समाजातील विविध स्तरांतील घटकांना स्वाभिमानी व सन्माननीय आयुष्य जगता यावे, या उद्देशाने विलास चाफेकर यांनी वंचित विकास संस्थेची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी, परित्यक्त्या, देहविक्रय करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, त्यांची मुले, तसेच आरोग्य क्षेत्रातील अनेक उपक्रम संस्था राबवित असल्याचे त्यांनी नमूद केले. लहान मुलांसाठी ‘निर्मळ रानवारा’ मासिक तसेच मुलांसाठी ‘निहार’ या निवासी संकुलासारखे प्रकल्प संस्थेच्या कार्यातील महत्त्वाचे टप्पे असल्याचे संचालिका सुनीताताई जोगळेकर यांनी सांगितले.
संगीताच्या सुरांनी भारलेल्या या मैफलीत एकत्र आलेल्या रसिकांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांबद्दल उत्सुकता आणि प्रशंसा व्यक्त केली. ‘मनात रुजलेली गाणी’ ही मैफल सूर, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरली.

