मुंबई–पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणात अनेक गंभीर आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आले आहेत. यामुळे प्रकरण अधिकच चिघळले असून पोलिस तपासावरही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः पंकजा मुंडे यांनी निवेदन जारी करत या घटनेबाबत दुख: व्यक्त केले असून, कोणतीही कसूर न करता सखोल तपास व्हावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
मुंडे म्हणाल्या की, घटनादिवशी संध्याकाळी त्यांचे पीए अनंत गर्जे अत्यंत आक्रोशाने फोनवर बोलले आणि पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. हा धक्का स्वतःलाही बसल्याचे त्या म्हणाल्या. गौरी गर्जे यांच्या वडिलांनी मुलीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक कोनातून तपास करावा, असे आवाहन करताना ही घटना मन सुन्न करणारी आणि अतिशय वेदनादायक असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या वरळी परिसरात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळी गौरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र गौरी यांच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू आत्महत्या नसून संशयास्पद असल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना राजकीय स्तरावरही चांगलीच गाजत असून या मृत्यूमागील सत्य काय, याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी गौरी पालवे गर्जे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र त्यावेळी कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या गौरी यांच्या नातेवाईकांनी शनिवारी रात्रीपासूनच वरळी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसून कडक कारवाईची मागणी केली. कुटुंबीयांचा आरोप असा की, गौरीची वाढती मानसिक घालमेल, तणाव आणि विवाहित जीवनातील समस्या यांमुळे त्या त्रस्त होत्या. त्यांच्या मते, ही साधी आत्महत्या नाही तर संशयास्पद मृत्यू असून यामागे घरातील छळ आणि वादांचे धागेदोरे आहेत. अखेर रविवारी सकाळी पोलिसांनी अनंत गर्जे व त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
या प्रकरणात राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. अनंत गर्जे हे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने ही घटना थेट राजकीय वर्तुळात पोहोचली. विविध पक्षांकडून आणि सामाजिक संस्थांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी होत आहे. गौरी आणि अनंत गर्जे यांचे लग्न अवघ्या काही महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नाचा कालावधी कमी असूनही गौरी यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले असावे? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिस कुटुंबीयांची चौकशी करून दोन्ही बाजूंचे निवेदन घेत आहेत. अनंत गर्जे घटनेच्या वेळी घरी नव्हते, असा दावा करीत आहेत; परंतु पोलिसांच्या तपासात या दाव्याची पडताळणी केली जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणावर स्वतः पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, शनिवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अनंत गर्जे यांनी रडत फोन करून पत्नीच्या आत्महत्येची माहिती दिली. ही घटना मला धक्का देणारी होती. पोलिसांनी कोणतीही कसूर न करता योग्य तपास करावा, अशी माझी विनंती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाले की, गौरीचे वडील अतिशय दुःखात आहेत, त्यांची वेदना मला समजू शकते. अशा घटना कोणालाही अस्वस्थ करून जातात. एखाद्या कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडत असते, हे बाहेरच्या लोकांना कधीच पूर्णपणे कळत नाही. अचानक घडलेल्या या प्रकाराने मी स्वतःही हादरून गेले आहे.
या प्रकरणावरील पुढील कार्यवाही आता पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहे. शवविच्छेदन अहवाल, कॉल रेकॉर्ड्स, घरातील परिस्थिती आणि दोन्ही कुटुंबीयांच्या विधानांच्या आधारे तपास पुढे नेला जाणार आहे. तिन्ही आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला असून आवश्यकता भासल्यास अटकही केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सूचित केले आहे. दरम्यान, गौरी यांच्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि नातेवाईकांनीही या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या या घटनेचा अंतिम निकाल तपासात काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

