मुंबई-मुंबईच्या वरळी भागात घडलेल्या एका घटनेने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे काही महिनेच झाले असतानाच हा प्रकार घडल्याने अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. गौरी गर्ज असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिच्या कुटुंबाने अनंतवर गंभीर आरोपही केले आहेत.गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात तिच्या मामांनी गंभीर आरोप केले असून, गौरी कधीच आत्महत्या करणारी मुलगी नव्हती; ती लढाऊ, मजबूत आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणारी होती, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते आणि ते गौरीला सतत मानसिक त्रास देत होते, असा दावा करत मामांनी गौरीचा मृत्यू हा आत्महत्या नसून संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. अनंत गर्जे यांनी स्वतःच्या हातावर वार करून मीही मरेन आणि तुला अडकवेन, अशी धमकी दिल्याचेही मामांचे म्हणणे आहे.
मुंबईतील वरळी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. भाजप नेत्या आणि सामाजिक न्यायमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. केईएम रुग्णालयात दंतवैद्यक विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या गौरी गर्जे या काही महिन्यांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घरातील वाढते वाद, अनंत गर्जे यांचे कथित अनैतिक संबंध आणि पतीचा त्रास या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून चौकशीला सुरुवात केली आहे. अनंत गर्जे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या त्यांच्या डोळ्यांसमोर घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, ते तिला थांबवण्यासाठी पुढे का सरसावले नाहीत, हा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे घरातून निघून गेले असून ते सध्या फरार आहेत, अशी माहिती पोलिसांकडून समोर येत आहे. त्यामुळे संशय अधिकच गडद होत असून, त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नसून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणात गौरी गर्जे पालवे यांच्या मामांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन महिन्यांपासून अनंत आणि गौरी यांच्यात सतत वाद सुरू होते. गौरीला अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. त्यानंतरही तिने संसार टिकवण्यासाठी त्याला माफ केले. परंतु, अनंत गर्जे यांनी त्या महिलेशी चॅटिंग करणे थांबवले नाही. याच कारणावरून घरात अनेकदा भांडणं व्हायची. एवढेच नव्हे, एकदा झालेल्या वादात अनंत यांनी स्वतःच्या हातावर वार करून मीही मरेन आणि तुला देखील त्यात अडकवेन, अशी धमकी दिल्याचेही मामांनी सांगितले. त्यांच्या मते, गौरी ही लढाऊ आणि मानसिकदृष्ट्या मजबूत मुलगी होती; ती कधी आत्महत्या करणार नाही. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

