मुंबई -भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच, 7 फेब्रुवारी रोजी अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता.
प्राथमिक माहितीनुसार, काल (शनिवारी, 22 नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. गौरी गर्जे यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील त्यांच्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्या केईएम रुग्णालयाच्या दंतचिकित्सा (डेंटिस्ट) विभागात कार्यरत होत्या. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. वरळी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला असून, प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
काल दोघांमध्ये मोठे भांडण
आत्महत्या करणाऱ्या डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणाला वेगळी दिशा दिली आहे. त्यांच्या मामाने टीव्ही 9 वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर होते. यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती आणि याबद्दल गौरीने आपल्या वडिलांना माहिती दिली होती, तसेच चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट ही पाठवले होते. काल गौरीने आत्महत्या केली, काल दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते आणि भांडणादरम्यान तिने स्वतःला संपवले, अशी माहिती अनंत गर्जेने दिली. महत्त्वाचे म्हणजे, गौरी स्वतःला संपवत असताना अनंत गर्जे घरात उपस्थित होता आणि तोच तिला दवाखान्यात घेऊन गेला होता, असेही कुटुंबियांनी सांगितले.
गौरीच्या कुटुंबीयांचा आरोप
डॉ. गौरी यांच्या मामांनी पुढे सांगितले की, त्यांच्या मुलीचा (गौरीचा) सासरच्या मंडळींकडून छळ होत होता. लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांत असे टोकाचे पाऊल उचलणे म्हणजे आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आपली मुलगी गमावल्यामुळे दुःखी असलेले कुटुंबीय बीडवरून मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. वरळी पोलिसांनी या गंभीर आरोपांची नोंद घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू केली आहे.

