सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे शनिवारी(दि.२२) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ९ ते १० जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी ही क्रुझर गाडी (एम एच २४ व्ही ४९४८) सोलापूर-हैदराबाद महामार्गावरुन जात होती. या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशिवमधील अणदूर (ता.तुळजापूर) येथील चिवरी पाटी येथील परिसरात त्यांच्या क्रुझरचे टायर्स अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही क्रुझर जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली.
ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या जबर धडकेमुळे गाडीत बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर ९ ते १० प्रवासी जखमी झाले. जखमींना तत्काळ पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णलयात पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील नातेवाईकांची शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झालेली आहे.
या अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी दक्षिण उळे सोलापूर येथील असल्याचे समजते. यामध्ये आकाश कदम, हरीकृष्ण शिंदे, माऊली कदम, अंजली आमराळे, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, कुणाल शिंदे, श्लोक शिंदे, बालाजी शिंदे, शिवांश कदम, कार्तिक आमराळे (रा.उळे, जि. सोलापूर ) अशी जखमींची नावे आहेत.
अपघात होताच आजूबाजूचे नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. नागरिकांनी तातडीने एकत्र येत जोर लावून पलटी झालेली क्रुझर गाडी सरळ केली. त्यानंतर गाडीतून मृतदेह आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून प्रशासनाला माहिती दिली. अपघाताच्यावेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक कोंबून बसवले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य आणि पुढील तपास सुरू आहे.

