पुणे: दोन वर्षांपूर्वीच घेतलेल्या नवीन प्रकल्पातील सदनिकेत गळती आणि अन्य दोष आढळून आल्याने विकासकाविरोधात केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना ‘महारेरा’ने ३० दिवसांच्या आत सदनिकेतील ही गळती आणि दोष दुरुस्त करण्याचे, तसेच यासंदर्भात भविष्यात कोणतीही तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. व्ही. आर. कुलकर्णी असोसिएट्स आणि एस. आर. कुलकर्णी डेव्हलपर्स या बांधकाम कंपनीविरोधात पुण्यातील तळजाई परिसरात ‘मेघदूत टॉवर कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी’चे माजी अध्यक्ष व वकील ऍड. अमित शहा यांनी ‘महारेरा’कडे तक्रार दाखल केली होती.
व्ही. आर. कुलकर्णी असोसिएट्स आणि एस. आर. कुलकर्णी डेव्हलपर्स यांनी पुण्यातील तळजाई परिसरात ‘मेघदूत टॉवर कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी’ हा प्रकल्प उभारला आहे. या सोसायटीमध्ये ऍड. अमित शहा यांची सदनिका आहे. सदनिका घेतल्यानंतर काही दिवसांतच बांधकामाचा दर्जा दुय्यम असल्याचे, तसेच मोठी गळती, इतर दोष असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी विकासकाकडे तक्रार करत दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत विकासकाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे ऍड. अमित शहा यांनी ‘महारेरा’कडे धाव घेतली. ऍड. अमित शहा यांनी दुय्यम बांधकाम, गळती, अर्धवट अमेनिटीज आदी गोष्टींचे फोटो ‘महारेरा’कडे सादर केले. लिफ्ट, त्यासाठी आवश्यक बॅकअप, ट्रान्सफॉर्मर्स, लिफ्टमधील कॅमेरे, क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पूल यासह अन्य सदोष गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत. ‘महारेरा’ने या सर्व गोष्टी अधोरेखित केल्या असून, विकासकाला येत्या ३० दिवसांत सदनिकेतील अडचणी सोडवण्यास सांगितले आहे.
ऍड. अमित शहा म्हणाले, “दोन्ही विकासकांना तोंडी आणि लेखी स्वरूपात अनेकदा विनंतीपत्र दिले. मात्र, त्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे न्यायासाठी महारेरा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली. ‘महारेरा’ने माझे म्हणणे ऐकून घेत माझ्या सदानिकेतील गळती आणि दोष दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. मला काही प्रमाणात न्याय मिळाल्याचे समाधान आहे.”

