कसबा पेठेतील नवदिप तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे आयोजन
पुणे : दादला नको ग बाई, असला नवरा नको ग बाई… फाटकं लुगडं आणि फाटकी साडी… अशा विनोदी गाण्यांच्या माध्यमातून गोविंद महाराज गायकवाड यांनी भारुड हा कलाप्रकार सादर करत कुटुंब व्यवस्था, व्यसनाधी ,सामाजिक विषयांवर प्रबोधन करत रसिकांचे मनोरंजन केले. कसबा पेठेत पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठी गर्दी केली.
कसबा पेठेतील फडके हौद चौकाजवळील नवदीप तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे देवदिवाळीनिमित्त गोविंद महाराज गायकवाड यांच्या समाज प्रबोधन पर भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष तुषार शिंदे आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जनजागृती भारूड मंडळ, आळंदी देवाची यांच्यातर्फे गोविंद महाराज गायकवाड व सहकारी यांनी भारुडाचे सादरीकरण केले. यावेळी लोककलावंतांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ या स्तोत्राने गोविंद महाराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आल्या पाचही गवळणी ही गवळण सादरीकरण करताना व्यासपीठावरच काही क्षणात पाच साड्या एकामागे एक बदलण्याचे आपले कौशल्य दाखवत गोविंद महाराज गायकवाड यांनी उपस्थित प्रेक्षकांमधील महिलांनाही आश्चर्यचकित करून सोडले. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेत कार्यक्रम रंगतदार केला.
काही कार्यकर्त्यांना त्यांनी कडेवर घेत कुटुंब नियोजनाचे महत्त्व तसेच व्यसन या सामाजिक विषयावर भाष्य केले. स्थानिक कलाकारांचा सहभाग, विनोदी किस्से, गाणी, गण, गवळण, भारुड अशा लोककला प्रकारांचे अप्रतिम सादरीकरण यामुळे कार्यक्रम अधिकाधिक रंगत केला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या स्वरूपात दाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमासंदर्भात अध्यक्ष श्री.तुषार शिंदे म्हणाले, भारुड हा मराठी लोककलेपैकी एक महत्त्वाचा प्रकार आहे. ही लोककला आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत आणि विशेषत: लहान मुलांपर्यंत पोहोचावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारुड मराठी मातीतील कला तरुण मुलांपर्यंत पोहोचली तर, ती आपोआपच पुढील पिढी पर्यंत जाते. अशा प्रकारे संस्कृती आणि लोककला जपण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे याचे आम्हाला समाधान वाटत आहे. भारुड ही लोककला केवळ विनोदी नाही. तर या कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवरही चांगल्या प्रकारे भाष्य करता येते. त्यामुळेच हा प्रकार नवीन पिढीने आत्मसात करून त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.

