मुंबई -मराठी तरुण स्व. अर्णव खैरे याला रेल्वेमध्ये भाषेवरून झालेल्या मारहाणीच्या धक्क्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आल्याच्या अत्यंत वेदनादायक घटनेनंतर राज्यभरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर समाजात भाषावाद व प्रांतवादाच्या आधारावर विष पसरविण्याचे राजकारण काही राजकीय पक्षांकडून केले जात असल्यामुळे भारतीय जनता पार्टी मुंबईकडून यावेळी निषेध करण्यात आला.या भाषवाद प्रवृत्तींना सदबुद्धी यावी या हेतूने आज शनिवार, दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर (मुंबई) येथे “सद्बुद्धी द्या” अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
स्व. अर्णव खैरे याच्या निधनाबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो. काही राजकीय व्यक्ती आणि पक्ष भाषेच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा आम्ही तीव्र निषेध करतो. समाजात वैमनस्य नव्हे तर ऐक्य राहावे, हीच आमची भूमिका आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर प्रार्थना करून अशा प्रवृत्तींच्या लोकांना सद्बुद्धी मिळो असे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम म्हणाले.
याप्रसंगी आ. अतुल भातखळकर, आ. प्रसाद लाड, मुंबई सरचिटणीस गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

