पुणे : परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्याच्या परिसरातून हरविलेले १७१ मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले असून हडपसर येथील मांजरी रोडवरी नेताजी मंगल कार्यालया आयोजित एका कार्यक्रमात पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. मोबाईल ही केवळ एक वस्तू नसून तिच्याशी आमच्या भावना जोडल्या होत्या, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामधील ९ पोलीस ठाण्याकडील सेंट्रल इक्विपमेंट आयटेंटीटी रजिस्टर या पोर्टलवरुन प्राप्त तक्रारीमधील तसेच पुणे शहर पोलीस वेबसाईट वरील लॉस्ट अँड फाऊंड या पोर्टलवरील तक्रारींमधील १७१ हरविलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले होते.पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सीईआयआर प्रणाली कशी कार्य करते. हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांकडून वापर केल्या जाणार्या तांत्रिक पद्धतीचा वापर याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली. डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, ‘‘मोबाईल आजच्या युगात आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. मोबाईल हरवला की व्यक्ती अस्वस्थ होतो, अशा वेळी पोलिसांवर ठेवलेला विश्वास आम्ही योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतो. नागरिकांच्या सुरक्षेसाठी, विश्वासाठी आणि सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. ’’
यावेळी मोबाईल मिळालेल्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमाल आहेत. आमच्या आठवणी याच्याशी निगडीत आहेत. मोबाईल हे आम्हाला आमच्या जवळचया व्यक्तींकडून भेट म्हणून आलेले आहेत. आमच्या महत्वाचा डेटा आमच्या मोबाईलमध्ये होता. हरविलेला मोबाईल परत मिळेल, म्हणून आम्हाला अपेक्षा नव्हती. परंतु, पोलिसांनी आमचे हरविलेले मोबाईल परत मिळविण्यामुळे आमचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढला आहे, अशा भावना व्यक्त करुन पोलिसांचे आभार व्यक्त केले.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी प्रास्ताविक केले. फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव यांनी सुत्रसंचालन केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, बापू लोणकर, माधुरी डोके, सोनाली कुंभार, विक्रम भोर, प्रकाश सावंत, सुनिल आव्हाड, स्वप्नील भुजबळ, तुकाराम झुंजार, अमोल दणके, महावीर लोंढे यांच्या पथकाने केली आहे़

