नाट्य परिषद कोथरूड शाखा आणि पुणे महापालिकेतर्फे 25ला कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेचा वर्धापन दिन तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन यानिमित्त आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून यशवंत-वेणू पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि गौरी प्रशांत दामले यांना गौरविले जाणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजीत धांडेकर, समीर हंपी यांनी आज (दि. 21) पत्रकार परिषदेत दिली. यशवंत-वेणू पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. पुणे महापालिकेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुटुंब किर्रतन (सर्वोत्कृष्ट नाटक), ठकीशी संवाद (सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक), दोन वाजून बावीस मिनिटांनी (विशेष लक्षवेधी नाटक) तसेच संदेश कुलकर्णी (सर्वोत्कृष्ट लेखक), विजय केंकरे (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), संकर्षण कऱ्हाडे (सर्वोत्कृष्ट अभिनेता), शुभांगी गोखले (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), दत्ता शिंदे (पडद्यामागील कलाकार) यांचा यशवंत सन्मानाने गौरव केला जाणार आहे.
माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार तसेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., नवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘धुंदी कळ्यांनो.. धुंदी फुलांनो’ हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अजित परब आणि मनिषा निश्चल गीते सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

