पुणे-
स्वच्छ संस्थेच्या कचरावेचक अंजू माने नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ भागात २० नोव्हेंबर रोजी देखील सकाळी ७ वाजल्यापासून दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या. गोळा केलेला कचरा फिडर पॉईंटला आणताना अंदाजे ८ ते ९ च्या दरम्यान त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. यापूर्वीही अशाच औषधाच्या बॅग मिळाल्याचा अनुभव अंजू यांना होता म्हणून तशीच कोणाची बॅग असेल असा विचार करून त्यांनी ती बॅग फीडर पॉइंट ला सुरक्षित ठेवली. पण बॅग उघडून पाहिल्यानंतर औषधांसोबत त्यात रोख रक्कम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेली जवळपास २० वर्षे या भागात काम करत असल्यामुळे अंजू परिसरातील सर्व नागरिकांना ओळखतात. त्यांनी ओळखीतील नागरिकांच्या मदतीने परिसरातील सर्वांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान एक नागरिक (त्यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांचे नाव व ओळख उघड करू शकत नाही) अतिशय अस्वस्थपणे काहीतरी शोधत असल्याचे अंजू ताईंनी पाहिले. त्यांनी त्या नागरिकाला बोलवून, आधी पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सापडलेली बॅग त्यांचीच असल्याचे निश्चित करून दहा लाख रक्कम जशीच्या तशी असलेली बॅग परत केली.

नागरिकानी देखील अंजू ताईंच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यासाठी त्यांना साडी व काही रोख रक्कम देऊन त्यांचा परिसरातील सर्व नागरिकांच्या साथीने सत्कार केला. अंजू माने यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की स्वच्छ मॉडल मुळे कचरा वेचक आणि नागरिक यांच्यातील नात्याची विश्वासाची वीण मागील २० वर्षात अधिक घट्ट झाली आहे. २० वर्ष दररोज दारोदार कचरा संकलन सेवा पुरवताना या प्रामाणिकपणामुळेच कचरावेचकांनी नागरिकांच्या मनात घर केलं आहे. ४० लाख पुणेकरांना ४००० ‘स्वच्छ’चे कचरावेचक पुरवत असलेल्या दैनंदिन दारोदार कचरा संकलनाच्या सेवेतही हा प्रामाणिकपणा सातत्याने दिसून येतो.

