अजित पवार, बावनकुळे यांच्याकडून पाठराखण प्रकार–त्यामुळे त्यांचेवरही संशयाची सुई ?
पुणे- -मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानीचा जबाब नाेंदवण्यासाठी पुणे पाेलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिला गुरुवारी पाचारण केले. ६ तास कार्यालयात बसून तिचा जबाब नाेंदवून घेत तसेच व्यवहाराची आवश्यक कागदपत्रे पाेलिसांनी घेतली. मात्र, शीतल तेजवानी हिने संबंधित जमिनीचे २७२ मूळ महार वतनदार यांच्याकडून काेणतेही पैसे न घेता पाॅवर ऑफ ॲटर्नी कशा प्रकारे घेतली आणि तिने काेणतेही पैसे न घेता सदर ४२ एकरची जमीन अमेडिया एलएलपी कंपनीस का विकली यामागील काेडे पाेलिसांना अद्याप उलगडले नसल्याने त्याबाबत तेजवानी हिच्याकडे सखाेल चाैकशी करण्यात आली आहे.
महार वतनदार यांच्या म्हणण्यानुसार सन २००६ मध्ये सदर जमिनीशी संबंधित पाॅवर ऑफ ॲटर्नी शीतल तेजवानी हिने घेतली आहे. याबाबत काही जणांना तेजवानी हिची कंपनी पॅरामाउंट एंटरप्रायजेसद्वारे पाच हजारांचे चेक दिले गेले, परंतु नंतर ते बाऊन्सदेखील झाले आहेत. तसेच ही जमीन सरकारकडून रि-ग्रँट मिळवण्यासाठी कुलमुख्त्यारपत्र दिले गेल्याचे सांगण्यात येत असून त्यात जागा विक्रीची तरतूद नव्हती. सन २०१३ मध्ये या जमिनीशी संबंधित वादाबाबत मुंबईत महसूल खात्याने बैठक घेऊन तत्कालीन महसूलमंत्र्यांनी ही जमीन बाॅटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांना ५० वर्षांच्या कराराने दिली
व्यवहार करतानादेखील तेजवानी हिने अमेडिया कंपनीकडून काेणतेही पैसे न घेता खरेदीखत कसे केले हा देखील प्रश्न पाेलिसांना पडला आहे. व्यवहारावेळी २१ काेटी रुपये दस्तनाेंदणी भरणे आवश्यक असताना केवळ ५०० रुपयांत हा व्यवहार कसा पार पडला याअनुषंगानेदेखील हिला प्रश्न विचारण्यात आले.
अंजली दमानिया यांना साेमवारी पाेलिसांनी त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी बाेलावल्याचे सांगण्यात आले. नेमका व्यवहार कशा प्रकारे पार पडला याचा उलगडा करण्यासाठी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांचीदेखील पाेलिसांकडून चाैकशी करून जबाब नाेंदवला जाईल.
या गुन्ह्यामध्ये अमेडिया कंपनीचा सहभाग निष्पन्न झाला आहे. या कंपनीत पार्थ पवार हे प्रमुख भागीदार असून त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे दुसरे भागीदार आहेत. पार्थ पवार यांनी संबंधित व्यवहार करण्यापूर्वी मे २०२५ मध्ये रिझाेल्युशन लेटरच्या माध्यमातून कंपनीच्या वतीने व्यवहार करण्याची जबाबदारी दिग्विजय पाटील यांना दिली असल्याचे कागदाेपत्री स्पष्ट दिसून येते. मात्र, अजित पवार यांनी मुलाची पाठराखण करत हा व्यवहार रद्द करत असल्याचे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सांगत चुकीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात अमेडिया कंपनीला ४२ काेटी रुपये दस्त नाेंदणी भरल्यानंतरच व्यवहार रद्द हाेऊ शकेल अशी नाेटीस कशी पाठवली गेली याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.
तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या जामिनावर २८ ला सुनावणी होणार
या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावरदेखील खडक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर येवले यांनी अटक टाळण्यासाठी वकिलांमार्फत पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला हाेता. मात्र, याप्रकरणी आता २८ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, सदर भाडेकरार हा सन २०३८ मध्ये संपुष्टात येणार असल्याचे सांगत तेजवानी हिचा अर्ज फेटाळून लावला हाेता. मात्र, त्यानंतर तेजवानी हिने जागेची परस्पर विक्री अमेडिया कंपनीला कशा प्रकारे केली याबाबतची चाैकशी पाेलिसांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

