#IFFIWood, sharad lonkar 20 नोव्हेंबर 2025
रस्त्यांवर उतरा. लय अनुभवा. कथा उलगडताना पहा. इफ्फी गोव्याला जिवंत, उत्साहपूर्ण वातावरणात परिवर्तित करते. आतापर्यंतच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासात प्रथमच, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने -इफ्फी 2025 ने पारंपरिक चार भिंती ओलांडून गोव्याच्या चैतन्यशील हृदयात पाऊल ठेवले आहे – तेथील लोक, रस्ते आणि भावनांना एका अभूतपूर्व उत्सवात सामावून घेतले आहे.
आज भव्य उद्घाटनाची नव्याने धाडसी कल्पना अमलात आणत इफ्फी 2025 ने शहराला एका विशाल, जिवंत कॅनव्हासमध्ये रूपांतरित केले – जिथे सिनेमाची भव्यता सांस्कृतिक वैभवात मिसळून गेली आणि कथाकथनाची अमर जादू गोव्याच्या रस्त्यांवर उतरली. कलाकार, कलावंत आणि चित्रपटप्रेमींची उर्जा आणि मनोरंजनाने सर्व रस्ते ओसंडून वाहत होते, गोवा जणू काही सर्जनशीलतेच्या स्पंदित कॉरिडॉरमध्ये रूपांतरित झाले – जो केवळ उत्सवाच्या प्रारंभाचा संकेत नव्हता तर इफ्फीच्या वारशातील एका धाडसी नवीन अध्यायाची ती पहाट होती.
या समारंभाचे उद्घाटन करताना गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी इफ्फीच्या वाढत्या जागतिक दर्जाचे कौतुक केले. ते म्हणाले, “इफ्फी हे सर्जनशील देवाणघेवाण, नवीन सहकार्य आणि चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेच्या उत्सवाचे एक अर्थपूर्ण व्यासपीठ बनले आहे. गोव्याचे आंतरराष्ट्रीय स्वरूप, सांस्कृतिक समृद्धता आणि जागतिक जोडणी लक्षात घेता चित्रपटप्रेमी येथे इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येणे स्वाभाविकच आहे.” त्यांनी यावर भर दिला.

ते म्हणाले की इफ्फीने नेहमीच पारंपरिक चित्रपट महोत्सवाच्या सीमा ओलांडल्या आहेत – जगभरातील कल्पना, कथा आणि सर्जनशील मनांसाठी बैठकीचे ठिकाण म्हणून काम केले आहे, तरुण चित्रपट निर्मात्यांना पाठिंबा दिला आहे, चित्रपटसृष्टीतील प्रतिभेचा सन्मान केला आहे आणि चित्रपट तसेच सर्जनशील उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्थळ म्हणून गोव्याच्या उदयावर प्रकाश टाकला. “जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह गोवा सज्ज आहे आणि म्हणूनच ते इफ्फीचे कायमचे घर बनले आहे. आपले निसर्गरम्य सौंदर्य चित्रपटनिर्मात्यांना आकर्षित करतेच, परंतु आपल्या मजबूत धोरणात्मक सुधारणा त्यांना पुन्हा पुन्हा येत राहण्यास भाग पाडतात”, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी नमूद केले की इफ्फी 2025 “सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण” ही संकल्पना साजरी करत आहे जे जागतिक सर्जनशील क्रांतीमध्ये भारताच्या नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे. “इफ्फी भारतीय प्रतिभेला जागतिक शक्यतांशी जोडते. गोव्याला भारताची सर्जनशील राजधानी बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. गोव्यात या, तुमच्या कथा सांगा, तुमचे चित्रपट चित्रित करा” असे आवाहन त्यांनी केले. भारतीय चित्रपटांना अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून देण्याच्या आणि कथाकथनाच्या जगात भारताला एक उदयोन्मुख मुलायम शक्ती बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला त्यांनी याचे श्रेय दिले.
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनीही उपस्थितांना संबोधित केले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी प्रत्येक पर्वागणिक विकसित होत गेला असल्याचे ते म्हणाले. याआधी परंपरेनुसार या महोत्सवाचा प्रारंभ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होत होता, मात्र यंदा, आपल्या राज्यांमधील वैविध्यपूर्ण परंपरांचं दर्शन घडवणाऱ्या, एका भव्य सांस्कृतिक कार्निव्हलच्या रूपात या महोत्सवाचा प्रारंभ झाल्याचे त्यांनी सांगितले. आशय सामग्री, सर्जनशीलता आणि संस्कृतीचे बळ लाभलेल्या ऑरेंज इकॉनॉमीची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती याचे स्मरण त्यांनी करून दिले. मुंबईत आयोजित केलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेसारख्या उपक्रमांमुळे देशभरातील उदयोन्मुख सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन मिळू लागले असल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्याला इफ्फीचे कायमस्वरूपी घराचे स्थान मिळवून देण्यात दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी पर्रीकर यांना श्रद्धांजलीही वाहिली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनीही उपस्थितांना संबोधित केले. यंदाच्या पर्वाच्या आयोजनाची वैशिष्ट्ये त्यांनी अधोरेखित केली. पहिल्यांदाच, इफ्फीचा प्रारंभ भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करणाऱ्या, एका भव्य कार्निव्हलने होत असल्याचे ते म्हणाले. या वर्षीच्या आयोजनाअंतर्गत आत्तापर्यंतचे सर्वाधिक चित्रपट दाखवले जात असून, हे चित्रपट सुमारे 80 देशांचे प्रतिनिधित्व करत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय आणि जागतिक प्रीमियरही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एआय फिल्म हॅकेथॉन आणि वेव्ह्ज फिल्म बाजार ही आजवरची सर्वात मोठी सिने बाजारपेठ, अशी नवी जोडही यंदाच्या आयोजनाला लाभली असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळेच आज सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि या उद्योग क्षेत्राशी संबंधीत नवोन्मेषाच्या बाबतीत इफ्फी आघाडीवर असल्याचे ते म्हणाले.
ऐतिहासिक भव्य संचलन

गोवा सरकारच्या 12 चित्ररथांसह दोन डझनहून अधिक चित्ररथांनी भारताचा सिनेमॅटिक वारसा, अॅनिमेशनचे जग आणि प्रादेशिक संस्कृतींच्या समृद्ध विविधतेचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे केंद्रीय संचार ब्युरो आणि एनएफडीसीने 50 व्या वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून सादर केलेला ‘भारत एक सूर’ हा भव्य लोककला कार्यक्रम होता. एनएफडीसी मागील पाच दशकांपासून देशभरातील चित्रपट निर्मात्यांना देत असलेले प्रोत्साहन आणि सिनेमॅटिक नवोपक्रमांना देत असलेली चालना यांचा हा गौरव होता. 100 हून अधिक कलाकारांनी पारंपारिक नृत्य सादर केले आणि या सादरीकरणाच्या भव्यतेने आणि उर्जेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
छोटा भीम, मोटू पतलू आणि बिट्टू बहानेबाज सारख्या लाडक्या अॅनिमेटेड पात्रांच्या उपस्थितीने उत्साहात भर पडली, त्यांनी साधलेल्या थेट संवादांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढली. या संचलनाने महोत्सवाच्या पुढील दिवसांसाठी एक उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण केले.
उद्घाटनाचा चित्रपट
गॅब्रिएल मस्कारोची डिस्टोपियन कथा ‘द ब्लू ट्रेल’, ज्याला मूळ पोर्तुगीजमध्ये ‘ओ उल्टिमो अझुल’ म्हणून ओळखले जाते, या चित्रपटाने आज 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी)उद्घाटन झाले, जे गोव्याच्या किनारपट्टी क्षेत्रात त्याच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. उद्घाटन झालेल्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा झाली ज्यामुळे लोकांमध्ये कौतुक आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

