देश संविधान साक्षर होण्यासाठी प्रयत्न व्हावेत : डॉ. श्रीपाल सबनीस
संविधानाचे प्रचारक सुशील बोबडे यांचा संविधानरत्न पुरस्काराने गौरव
पुणे : मायभूमीविषयी प्रत्येकाच्या मनात प्रेम आहे त्याचबरोबरीने राष्ट्रध्वजाचाही सन्मान होत आहे; पण संविधानाविषयी किती लोकांच्या मनात प्रेम आहे? मतांच्या मोबदल्यात जनता विकली जाणार असेल तर संविधान जागर कशासाठी? असे प्रश्न उपस्थित करीत देश संविधान साक्षर होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे संविधानाचे प्रचारक सुशील बोबडे यांचा आज (दि. 20) संविधानरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. अभय छाजेड, डॉ. गौतम बेंगाळे, मौलाना सुलतान शेख, लता राजगुरू मंचावर होते. तिरंगी शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सर्वच राजकीय पक्षांनी लोकशाहीचा बोऱ्या वाजविला आहे. सत्ता आणि संपत्ती अशा स्वार्थी भावनेतून राजकीय पक्षांची वाटचाल सुरू आहे, असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, हर घर तिरंगा ही पंतप्रधानांची भूमिका एकतर्फी आहे. राष्ट्रभक्तीच्या या प्रयोगात संविधान का नाही? वैचारिक भ्रष्टाचार, जातीवाद, डावे-उजवे, धर्मांधता ही संविधानाला अमान्य आहे. शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना सुशील बोबडे म्हणाले, देशासाठी त्याग केला पाहिजे या भूमिकेतून देशाच्या कानाकोपऱ्यात सायकलद्वारे फिरून संविधानाविषयी जागृती करीत आहे. आतापर्यंत नऊ हजार कि.मी. प्रवास झाला असून संविधानाविषयी लोकांशी संवाद साधत आहे. प्रामाणिक प्रयत्नामुळे पुरस्कार मिळाला आहे, अशी माझी भावना आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, संविधानाला अपेक्षित कार्याद्वारे समाजाला दिशा देण्याचे कार्य विविध उपक्रमांद्वारे सुरू आहे. कार्यशील व्यक्तीला पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे, याचे समाधान आहे.
ॲड. अभय छाजेड, मौलाना सुलतान शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार लता राजगुरू यांनी मानले.

