20 दिवसांपूर्वीच घेतली होती नवीन कार
पुणे- पर्यटनासाठी कोकणात निघालेल्या तरुणांच्या एका ग्रुपवर काळाने घाला घातल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात उघडकीस आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ‘थार’ कार 500 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे .मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील काही तरुण मंगळवारी रात्री कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर हा अपघात झाला. मंगळवारपासून हे तरुण संपर्कात नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. मोबाईल लोकेशन तपासले असता, ते रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आज सकाळी स्थानिक रेस्क्यू टीम आणि पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता, 500 फूट खोल दरीत चक्काचूर झालेली थार आढळून आली.
हृदयद्रावक बाब म्हणजे, ज्या गाडीचा अपघात झाला ती ‘थार’ कार अवघ्या 20 दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती. नवीन गाडीतून फिरण्यासाठी निघालेल्या या तरुणांचा प्रवास अखेरचा ठरला. कारमध्ये एकूण 6 पुरुष प्रवासी होते. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातात प्रथम चव्हाण, पुनित शेट्टी, साहील बोटे, महादेव कोळी, ओंकार कोळी, शिवा माने या तरुणांचा मृत्यू झाला असून, हे सर्व पुण्यातील रहिवासी होते. इतर दोघांचा शोध सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस आणि ‘सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थे’च्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. दरीची खोली जास्त असल्याने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह आढळून आले असून, दोरखंड आणि क्रेनच्या साहाय्याने ते बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अद्याप दोन जण बेपत्ता असल्याने रेस्क्यू टीम त्यांचा कसून शोध घेत आहे.”
सोमवारी (ता.१७) रात्री ११.३० वा. चार चाकी थार गाडीने कोकणात फिरण्यासाठी प्रथम शहाजी चव्हाण (वय-२२,रा. कोंढवे धावडे, पुणे) पुनित सुधारक शेट्टी, (वय-२०, रा. कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे), साहील साधु बोटे (वय-२४, रा. कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे) श्री महादेव कोळी (वय-१८, रा. कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे), ओंकार सुनील कोळी (वय-१८, रा. कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे,) शिवा अरुण माने (वय-१९, रा. कोपरे गाव,भैरवनाथ नगर, पुणे) हे सर्व सहा युवक निघाले होते. परंतु दुसऱ्या दिवसापासून त्या सर्व युवकांचा कोणताही संपर्क त्यांच्या घरच्यांशी त्यांच्या मित्रांशी तसेच नातेवाकांशी झाला नाही. त्यामुळे चिंतेत पडलेल्या त्या युवकांच्या पालकांनी या घटनेबाबत उत्तमनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
१९ नोव्हेंबरच्या रात्री माणगाव पोलिसांनी ताम्हिणी घाटात शोधमोहीम सुरू केली. तेव्हा एका अवघड वळणावर लोखंडी संरक्षण कठडा तुटलेला आढळला. ड्रोन उड्डाण केल्यानंतर घनदाट झाडीत थार कारचा एक भाग चमकताना दिसला व अपघात निश्चित झाला. रात्र झाल्याने तपास मोहीम थांबवावी लागली; मात्र २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० पासून पुन्हा मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.दुपारी ३.१५ वाजण्याच्या दरम्यान दरीतील झाडा झुडपात विखुरलेल्या अवस्थेत सहाही तरुणांचे मृतदेह मिळाले
ताम्हिणी घाटातील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
जीर्ण झालेले संरक्षण कठडे, असुरक्षित वळणे, रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था नसणे आणि वाहतूक या सर्व बाबींची मोठी पुनर्पडताळणी होण्याची आवश्यकता आहे. ही दुर्घटना ताम्हिणी घाटातील सुरक्षिततेची दयनीय अवस्था उघड करते आणि प्रशासन तसेच हा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असल्याने या विभागावर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

