पुणे- जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात मंगळवारी संध्याकाळी एका सात वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी ऊसतोड मजूर कुटुंबातील असून, तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी हा देखील त्याच वस्तीतील शेजारीच असल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. आरोपीचे नाव देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) असे असून तोही ऊसतोड कामगार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला जबरदस्तीने एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घाबरून घरी परतल्यानंतर तिने आई-वडिलांना सर्व हकिकत सांगितली. मुलीने आरोपीचे नाव स्पष्टपणे सांगितल्याने पालकांनी तात्काळ ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ओतूर पोलिसांनी त्वरित कारवाई करत काही तासांच्या आत आरोपी देवीदास गर्जेला अटक केली. पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे पुढील तपास करीत आहेत. पीडित बालिकेवर पुण्यातील शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे.या घटनेनंतर ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ओतूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आणि शांतता राखली. या प्रकरणी भा.द.वि. कलम ३७६, ३७६ (२)(एन), तसेच पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांन्वये देविदास गर्जे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
Date:

